मोहोपाडा : प्रतिनिधी
चावंढोळी गावाच्या हद्दीत सिध्देश्वरी कॉर्नर येथे रस्त्याच्या खाली असलेल्या अंडरग्राऊंड गटारात पाण्याचे पाइप टाकण्यास गेलेल्या जगन पांडुरंग पवार (वय 30) यांचा मृत्यू झाल्याची घटना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चावंढोळी गावाच्या हद्दीत सिध्देश्वरी कॉर्नर येथे रस्त्याच्याखाली असलेल्या अंडरग्राऊंड गटारात पाण्याचे पाइप टाकण्यासाठी कोणतेही सुरक्षेची साधन व गटाराची खोली रुंदी माहिती न घेता तसेच ते काम करण्यास कोणत्याही विहीत संस्थेची लेखी परवानगी न घेता गटारात उतरण्यास व काम करण्यास जगन पांडुरंग पवार यांना सांगितले. अंडरग्राऊंड गटारात काम करीत असताना जगन पवार यांचा गुदमरून व पाण्यात पडून मृत्यू झाला.
यामुळे संबंधित व्यक्ती धिरज गणपत पाटील (वय 22), ज्ञानेश्वर सोपान गायकवाड (वय 43), प्रकाश रघुनाथ खंडा (वय 34) यांच्यावर रसायनी पोलीस ठाण्यात निष्काळजीपणामुले मृत्यू झाल्याबाबत गुन्हा रजिस्टर नं.2/2021 भा.दं.वि.स.कलम 304 (अ) 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मुल्ला करत आहेत. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास तहसीलदार इरेश चप्पलवार, मंडल अधिकारी नितीन परदेशी, तलाठी कोतवाल गायकवाड व इतर शासकीय अधिकार्यांनी मयत जगन पांडुरंग पवार यांच्या कैरे येथील निवासस्थानी भेट घेतली. या वेळी मयताच्या कुटूंबाला घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले.