Breaking News

नेरूळ-उरण रेल्वेच्या कामाला गती येणार

दुसर्‍या टप्प्यातील खारकोपर ते जासई दरम्यानचा अडथळा दूर

उरण : वार्ताहर

बहूप्रतिक्षित नेरूळ-उरण रेल्वेच्या दुसर्‍या टप्प्याचे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खारकोपर ते रांजणपाडा दरम्यान असलेल्या खाजगी जमिनीचे संपादन रखडले होते. या प्रकल्पामध्ये सुमारे 67 गुंठे खाजगी जमिन संपादित करावी लागणार आहे. या 67 गुंठे जमिनीचे निवाडे अंतिम टप्प्यात आले असून प्रारूप मंजूरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोपविण्यात आले असल्याची माहिती भूसंपादन अधिकारी अश्विनी पाटील यांनी सांगितले. सिडकोच्या वतीने 1997 मध्ये नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. मात्र 2012 मध्ये या मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली होती. 27 किमी लांबीचा हा रेल्वे मार्ग आहे. या प्रकल्पाचा 67 टक्के खर्च सिडको आणि 33 टक्के खर्च रेल्वेकडून करण्यात येणार आहे. सुरुवातीला या प्रकल्पाचा खर्च 500 कोटी अपेक्षित होता आता मात्र हा खर्च दोन हजार कोटींच्या वर गेला आहे. गेल्या वर्षी 4 नोहेंबरला नेरूळ-उरण रेल्वे मार्गावर खारकोपर पर्यंत पहिल्या टप्प्यात रेल्वे सेवा सूरू करण्यात आली. मात्र वर्ष उलटून गेले तरी उर्वरीत खारकोपर ते उरण या दुसर्‍या टप्प्यातील रेल्वे मार्गाचे काम रखडले होते. कधी वन विभागाच्या जमिनीचे भूसंपादन, कधी खारफुटी आणि खाजगी जमिनीचे संपादनामुळे हे काम रखडले होते. या अडथळ्यांपैकी खाजगी जमिन संपादनाचा अडथळा दुर झाला आहे. 12 खातेदारांच्या 67 गुंठे जमिनीचे निवाडे पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या खातेदारांच्या जवळ जवळ सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. याचा मोबदला म्हणून त्यांना साडेबाविस टक्के विकसित भूखंड देण्यात येणार आहेत तसेच प्रकल्पात मोडणार्‍या जमिनी व्यतिरिक्त जमिनी देखिल रेल्वे व सिडकोने घेण्याचे मान्य केले आहे. सिडकोतर्फे देण्यात येणारे साडेबाविस टक्के विकसित भूखंड हे उलवे नोड मधील सेक्टर- 26 येथे देण्यात यावे ही मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे. मात्र उलवे नोड मध्ये सेक्टर 26 हा आरक्षित असला तरी विकसित केला नसल्यामुळे सध्यातरी येथे भूखंड देणे अशक्य असल्याचे बोलले जाते. उरण-खारकोपर या दुसर्‍या टप्प्यातील रेल्वे कामामधील खाजगी जमिन संपादित करण्याचा महत्वाचा अडथळा दुर झाल्यामुळे दुसर्‍या टप्प्याचे काम लवकरात लवकर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उरण नेरूळ रेल्वे प्रकल्पात पहिल्या टप्प्यामध्ये सिडकोची भागिदारी अधिक होती सध्या सुरू असलेल्या दुसर्‍या टप्प्याच्या कामात रेल्वेची भागिदारी जास्त आहे. त्यामुळे या कामाच्या प्रगतीबाबत मला माहिती नाही.

-प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply