पनवेल : बातमीदार
कळंबोली पोलिसांनी ई-चलन मशिनद्वारे 2019 या वर्षामध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या 6,792 वाहनचालकांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल 22 लाख 82 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईत विनाहेल्मेट, ट्रीपल सीट नेणार्या वाहनचालकांचा समावेश आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेशिस्त वाहनचालकांमुळे रस्ते अपघातांत वाढ होत असल्याने पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांवर मोटर वाहन कायद्यानुसार जास्तीत जास्त कारवाई करण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाण्याला दिले. त्यासाठी ई-चलन मशिनसुद्धा देण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी पोलीस हवालदार मच्छिंद्रनाथ ढाणे व पोलीस शिपाई सोमनाथ गायकवाड यांचे विशेष पथक तयार केले आहे. कळंबोली पोलिसांकडून नियमित सुरू असलेल्या कारवाईमुळे कळंबोलीतील नागरिकांमधूनदेखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ही कारवाई यापुढील काळातही नियमित सुरू राहणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले.