नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. यावर्षी मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाला 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महिलांवरील वाढते अत्याचार, हल्ले, असुरक्षित वातावरण या पार्वभूमीवर विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम विद्यापीठाच्या विधी विभागाने हाती घेतला आहे.
विधी महाविद्यालयात, मुंबई विद्यापीठाचा विधी विभाग आणि भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 18) स्वसंरक्षणाबाबत एक दिवसीय विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत महाविद्यालयातील अनेक विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी प्रमुख पाहुण्या डॉ. राजेश्री वर्हाडी, मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाच्या विभाग प्रमुख यांचे स्वागत केले आणि त्यानंतर डॉ. राजेश्री वर्हाडी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी होणार्या विविध कार्यक्रमांत भाग घेण्याचा सल्ला दिला आणि विद्यापीठाच्या स्वसंरक्षणाच्या उपक्रमाची
माहिती दिली. या कार्यशाळेत प्रशिक्षक शिवाजी पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी अनेक प्रात्याक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. आणि अचानक झालेल्या हल्ल्यांमध्ये स्वत:चा बचाव कसा करायचा हे दाखवून दिले. मुंबई विद्यापीठाचे सहा. शिक्षक संजय जाधव यांनी कायदेशीर जागरूकता या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबतच इतर विधी महाविद्यालयातीलसुद्धा काही विद्यार्थी उपस्थित होते. त्याच सोबत सहा. शिक्षिका दीपाली बाबर, सहा. शिक्षिका वृषाली रामटेके, सहा. शिक्षिका प्रियांका म्हात्रे, सहा. शिक्षिका श्रुती पोटे या सुद्धा उपस्थित होत्या. सूत्र संचालन सुयश बारटक्के आणि ऋषिकेश पाटील यांनी केले.