पनवेल : बातमीदार
रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मेळावा रविवारी (दि. 19) झाला. या वेळी ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभली.
रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. महाविद्यालयाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येणार आहे. यात प्रत्येक माजी विद्यार्थी, शिक्षकांचा हातभार लागावा, तसेच त्यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले आहे, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित माजी विद्यार्थ्यांकडून सूचना मागवण्यात आल्या. यासंदर्भात विचारविनिमय व कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता महाविद्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. माजी विद्यार्थी मेळाव्यास लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, गणेश कडू, विजय लोखंडे, उल्का धुरी, तसेच प्राचार्य गणेश ठाकूर, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संंख्येने उपस्थित होते. महाविद्यालयासाठी आवश्यक असणार्या मदतीसाठी तयार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.