Breaking News

सिग्नल तोडणार्या वाहनचालकांवर कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांना चाप बसावा यासाठी पनवेल शहरात वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे वाढते अपघातांचे प्रमाण व त्यामुळे होणार जीवितहानी रोखण्यासाठी वाहनचालकांना शिस्त लावणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या सूचनेनुसार पनवेल शहर वाहतूक विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरातील शिवशंभो नाका व नवीन पनवेल सिग्नल याठिकाणी मागील पाच दिवसांपासून सिग्नल जंपिंग ड्राइव्ह सुरू आहे.

पनवेल शहर हे आजूबाजूच्या गावांची मुख्य बाजरपेठ व मध्यवर्ती कार्यालयांचे ठिकाण असल्याने याठिकाणी दररोज परिसरातील नागरिक खरेदीसाठी व इतर कार्यालयीन कामकाजासाठी येत असतात. त्याचबरोबर पुणे, गोवा महामार्ग, उरण, कर्जत, खोपोली आदी ठिकाणी जाण्यासाठी अनेक मार्ग गेलेले असल्याने शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांची कायमच वर्दळ असते. शहरातील गार्डन हॉटेल, नवीन पनवेल मार्ग, एचडीएफसी सर्कल, शिवशंभो नाका याठिकाणी सिग्नल असून वाहतूक नियमन करण्यासाठी वाहतूक पोलीस नेमलेले आहेत. तरीही काही बेशिस्त वाहनचालकांकडून सर्रास सिग्नल मोडून वाहने पुढे नेली जातात. यात प्रामुख्याने दुचाकीस्वारांकडून सर्रास सिग्नल जॅम्पिंग केले जात असल्याचे निदर्शनास आले. वाहतूक पोलीस अशा वाहनधारकांवर सातत्याने कारवाई करतात. त्यानंतरही वाहनचालकांमध्ये सुधारणा होत नाही. उलट सिग्नलवर वाहन पुढे नेऊन जीव धोक्यात घालून प्रवास केला जात आहे.

मोबाइलवर बोलत, सिग्नल मोडणार्‍या वाहनचालकांमुळे अनेक अपघाताचे प्रसंग घडलेले आहेत. यामुळे रस्ता ओलांडणार्‍या अनेकांचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झालेला आहे. त्यातच चिंतेची बाब म्हणजे एनएमएमटी बस चालकांमध्येदेखील सिग्नल तोडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत. त्याबरोबरीने रिक्षा चालकांकडूनही अनेकदा सिग्नल जंपिंगचे प्रकार घडतात. तसेच भरधाव वेगाने वाहने चालवणारे रोडरोमियो पनवेल शहरात अधिक पहायला मिळतात. त्यामुळे अशा वाहनचालकांवर वाहतूक विभागाने सातत्याने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

आतापर्यंत 172 जणांवर कारवाया

पनवेल शहरात सिग्नल जंपिंग ड्राइव्ह सुरू असून आतापर्यंत एकूण साधारण 172 कारवाया करण्यात आल्या आहेत. तर सिग्नल तोडणार्‍या 114 वाहनचालकांचे लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत. याचबरोबरीने स्टॉप लाईनच्या 73 कारवाया करण्यात आल्या असून 37 प्रस्ताव आरटीओकडे पाठवण्यात आले आहेत. या कारवायांमुळे वाहनचालकांनाही काही काळ वाहतुकीची शिस्त लागली असल्याने याबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. सिग्नल जंपिंग करू नये. काहीजण अतिशय धोकादायक पद्धतीने सिग्नल जम्पिंग करतात, त्यामुळे अनेकदा अपघाताचे प्रसंग घडले आहेत. अनेकजणांनी प्राणही गमावले आहेत. झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करू नयेत. झेब्रा क्रॉसिंग लाईनच्या मागे गाडी थांबवावी. पादचार्‍यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. सिग्नल जंपिंग करणार्‍या वाहनचालकांचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केले जाईल.

-संजय नाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर वाहतूक विभाग

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply