सुधागड तालुक्यात दुपारपर्यंत 50 टक्के मतदान
पाली : प्रतिनिधी
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी मतदान घेण्यात आले. पेण, सुधागड, रोहा मतदारसंघात सर्वत्र शांततेत मतदान झाले. सुधागड तालुक्यात दुपारी 4.15 वाजेपर्यंत 50 टक्के मतदान झाले होते. सुधागड तालुका प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक ती जय्यत तयारी करण्यात आली होती. तालुक्यात एकूण 80 केंद्रांवर मतदान घेण्यात आले. पाऊस नसल्याने मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून गर्दी होत होती. दुपारनंतर मतदारांचा ओघ वाढला. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचता यावे याकरिता ठिकठिकाणी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक मतदार आपली खासगी वाहने व दुचाकीवरून मतदान केंद्रात पोहचून मतदानाचा हक्क बजावताना दिसले. या वेळी युवा मतदारांनी दिव्यांग व वृद्धांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. या मतदान प्रक्रियेसाठी सुधागड तालुक्यात 450 प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. तालुक्यातील 80 मतदान केंद्रांवर तहसीलदार, सर्कल, तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, क्लार्क, शिपाई आदींनी निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. सुधागडात निवडणूक प्रक्रियेदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.