Breaking News

शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेण्याचा काँग्रेसचा डाव : पाटील

पुणे : प्रतिनिधी
काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून हळूहळू दूर नेत आहे. अगदी योजनाबद्धपणे हे सगळे सुरू आहे. मराठी माणूस आणि हिंदूंचा रक्षणकर्ता पक्ष अशी जी शिवसेनेची ओळख होती ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे जावी आणि महाराष्ट्रात शिवसेनेची जागा मनसेने घ्यावी, असा यामागचा डाव आहे. उद्धव ठाकरे यांनी हा डाव वेळीच ओळखावा, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. 5) येथे म्हटले. महाराष्ट्रात वर्षअखेरीस मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असे भाकीतही पाटील यांनी या वेळी वर्तविले.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मी शिवसेनाचा हितचिंतक आहे, असे म्हणत शिवसेनेला अनेक सल्ले दिले. ’नागरिकत्व कायदा देशातून कुणालाही बाहेर काढण्यासाठी केलेला कायदा नाही. हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी करण्यात आला आहे’, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्याकडे बोट दाखवत उद्धव ठाकरे या कायद्याशी सहमत असतील, तर त्यांनी हा कायदा महाराष्ट्रात लागू करावा. महाराष्ट्रात या कायद्याविरोधात सुरू असलेली आंदोलने थांबवावी, असे आवाहन पाटील यांनी केले.
वीर सावरकरांवर काँग्रेसच्या नेत्यांकडून अत्यंत गलिच्छ असे आरोप करण्यात आले. तेव्हा शिवसेना शांत का बसली?, असा सवालही पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केला.
आमच्या सरकारच्या काळातील योजना रद्द करण्यात येत असतील, तर त्याला आमची काहीच हरकत नाही, मात्र एखादी योजना रद्द करत असताना त्याला पर्यायी योजना सुरू करायची असते, याचे भान सरकारने राखायला हवे, असे पाटील यांनी नमूद केले. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवले जाणार अशी चर्चा आहे. त्याबाबत विचारले असता यात कोणतेही तथ्य नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत सुरुवातीला जे चित्र होते ते आता नाही. गेल्या तीन-चार दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सभांचा धडाका सुरू असून, दिल्लीत भाजपचे वारे वाहू लागलेत, याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply