अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई
पनवेल ः वार्ताहर
वेश्या व्यवसाय चालवणार्या महिलेस नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तळोजा फेज-2मधील सिल्व्हर लाइफ स्टाइल इमारतीतील घरावर छापा मारून अटक केली आहे. या वेळी पथकाने वेश्या व्यवसायासाठी बोलाविण्यात आलेल्या दोन मुलींचीही सुटका केली आहे.
तळोजा से. 20 भागात शाल्या नावाची महिला आपल्या घरातून वेश्या व्यवसाय चालवत असून तिच्या मोबाइलवर संपर्क साधणार्या ग्राहकांना ती आपल्या घरात बोलावून मागणीनुसार त्यांना वेश्या गमनासाठी मुली पुरवत होती.
याबाबतची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील भोळ आणि त्यांच्या पथकाने सदर महिलेशी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यानंतर सदर महिलेने त्या ग्राहकाला आपल्या घरी बोलावून घेऊन त्याला वेश्यागमनासाठी दोन मुली दाखविल्या. त्यातील एका मुलीची निवड केल्यानंतर शाल्याने त्याच्याकडून एक हजार रुपये घेतले. त्या वेळी सदर पथकाने छापा टाकून शाल्या शफिक खानला ताब्यात घेऊन तिच्याविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.