Monday , February 6 2023

शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झाला का? कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना सवाल

अमरावती : प्रतिनिधी
राज्यातील 75 टक्के शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसल्याने ठाकरे सरकारचा हा निर्णय तकलादू आहे. निव्वळ शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी आणखी कर्जात गुंतत असताना सातबारा कोरा झाला का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
संघटनात्मक बांधणीच्या उद्देशाने विदर्भ दौर्‍यावर असलेल्या शेट्टी यांनी बुधवारी (दि. 5) माध्यमांशी संवाद साधला. दोन्ही कर्जमाफींचा कित्येक शेतकर्‍यांना लाभ मिळालेला नाही. एक लाखाच्या आत शून्य टक्के व दोन लाखांपर्यंतच्या कर्जावर डॉ. पंजाबराव देशमुख शेतकरी व्याज सवलत योजनेतून तीन टक्के व्याजाची आकारणी होते. यानंतरच्या रकमेवर शेतकर्‍यांना 12 ते 13 टक्के व्याज मोजावे लागते. या सर्व शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला का, असा प्रश्न त्यांनी विचारला. आजही राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. दररोज 10 शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. हे चित्र निराशाजनक असल्याचे शेट्टी म्हणाले.
शेतकर्‍यांसाठी सध्या अत्यंत कठीण काळ आहे. दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती व ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भातील खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झाला. रब्बीदेखील माघारला. शेती पिकांच्या नुकसानीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हेक्टरी 25 हजार रुपये मदतीची मागणी राज्यपालांकडे केली होती, मात्र सत्तेत येताच त्यांना याचा विसर पडला. या सरकारद्वारे घोषणांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. तूर, कापूस, सोयाबीन आदी शेतमालाला हमीभाव मिळत नाही. हमीभाव व प्रत्यक्ष विक्री झालेला दर यामधील तफावत शासनाने शेतकर्‍यांना द्यायला हवी, तरच भ्रष्टाचार थांबेल व शासनाची पै न पै मदत शेतकर्‍यांपर्यंत पोहोचेल, असेही ते म्हणाले.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply