Breaking News

घोटाळेबाज विवेक पाटलांचे साथीदारही होणार गजाआड

‘ईडी’पाठोपाठ आता राज्य सीआयडीही करणार कारवाई

पनवेल ः प्रतिनिधी
बोगस कर्ज प्रकरणे आणि भ्रष्टाचारामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील सध्या जामीन मिळवण्यासाठी धडपडत आहेत. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी न्यायालयाने त्यांना अद्याप जामीन मंजूर केलेला नसल्याने ते जेलमध्येच आहेत. या प्रकरणात सहकार खात्याने केलेल्या तपासानुसार जबाबदार असलेल्या सर्वच संचालकांना आणि दोषी कर्मचार्‍यांना सीआयडीकडून लवकरच ताब्यात घेतले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
कर्नाळा नागरी सहकारी बँक बोगस कर्ज प्रकरणे आणि भ्रष्टाचारामुळे अडचणीत आली आहे. त्यामुळे 50 हजारांहून अधिक ठेवीदारांना त्याचा मोठा फटका बसला आहे. बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील सध्या तुरूंगात आहेत. त्यांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही.
सहकार खात्याने केलेल्या तपासानुसार या बोगस कर्ज प्रकरणास केवळ विवेक पाटीलच जबाबदार नसून त्यांना साथ देणारे संचालक आणि बँकेचे अधिकारीही जबाबदार असल्याने त्यांच्यावरही कारवाई करणे गरजेचे आहे.
विवेक पाटील हे बँकेचे अध्यक्ष या अधिकारात (बोगस) कर्जदारांची कागदपत्रे तपासत नव्हते किंवा त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी स्वत: चेकबुक घेऊन कर्जदाराची सही घ्यायला जात नव्हते. ही कामे करणारे बँक कर्मचारीही या घोटाळ्याला जबाबदार आहेत. त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. ती कारवाई अद्याप क्राइम ब्रँचने केलेली नाही.
विवेक पाटील यांनी बँकेची चौकशी सुरू झाल्यावर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी मार्च महिन्यातच अर्ज दाखल केला होता. यावरून घोटाळ्याच्या चौकशीत आपण दोषी असल्याची त्यांना खात्री होती हे दिसून येते. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असल्याने या प्रकरणाची चौकशी धीम्या गतीने सुरू होती. क्राइम ब्रँचची आर्थिक गुन्हे शाखाही धीम्या गतीने तपास करीत होती, पण ईडीने तपास सुरू करून विवेक पाटील यांना अटक केल्याने आता त्यांना जाग आली असून त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच विवेक पाटील यांचे सहकारी आणि कर्नाळा बँकेच्या दोषी कर्मचार्‍यांनाही अटक होणार असल्याचे समजते.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply