Breaking News

महिला असुरक्षितच!

सुसंस्कृत, पुरोगामी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांमध्ये अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या विकृतांना वेळीच कडक शिक्षा होत नसल्याने त्यांची मजल वाढली आहे. हल्ली तर महिलांना जिवंत जाळण्याचे प्रकार राज्यात सातत्याने होऊ लागले आहेत. अशा वेळी राज्य सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

हिंगणघाट जळीत प्रकरणामुळे संतापाची लाट असतानाच नाशिकच्या लासलगावमध्ये एका विवाहितेला पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकावर ही धक्कादायक घटना घडली. यामध्ये पीडित महिला 67 टक्के भाजली असून, तिची प्रकृती गंभीर बनल्याने तिला अधिक उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या एकापाठोपाठ घटना समोर आल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका प्राध्यापक तरुणीला एकतर्फी प्रेमातून पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेतील  तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे या विकृताने हे कृत्य केले. या विकीचे लग्न झालेले असून, त्याला एक लहान मुलगीदेखील आहे. दुष्कृत्य करताना त्याने किमान स्वत:च्या लहानग्या मुलीचा तरी विचार करायला हवा होता. दुसर्‍या घटनेत औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावातील महिलेला पेटवून देण्यात आले. तिचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपी संतोष मोहितेने या 50 वर्षीय महिलेच्या घरात घुसून अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले होते. पीडिता आणि आरोपी यांच्यांत संबंध होते, असे म्हटले जात आहे. या दोघांमध्ये संबंध असले तरी तिला जाळण्याचा अधिकार त्याला कुणी दिला, हा प्रश्न उपस्थित होतो.  वर्धा, औरंगाबादनंतर राज्याच्या इतर भागातही असे प्रकार समोर आले. आता अशा घटना राजरोसपणे घडू लागल्या आहेत. याचे कारण कायद्याचा धाक उरलेला नाही. पूर्वी पोलीस कारवाई म्हटली की लोक घाबरायचे. आता मात्र पोलिसांचा वचक राहिलेला नसल्याने गुन्हेगारी वाढू लागली आहे. बरं पोलीस यंत्रणेने खरोखरच कारवाई केली, तर कायद्यातील पळवाटा आहेतच. त्यातून अनेकदा आरोपी सहीसलामत सुटतो आणि नवा गुन्हा करण्यास सज्ज होतो. आता राज्य सरकारनेच यावर उपाय योजले पाहिजेत. नाशिकमधील घटना घडली त्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. घटनेची माहिती समजताच ठाकरे रात्री जिल्हा शासकिय रुग्णालयात पोहोचले आणि गंभीररित्या भाजलेल्या महिलेची जळीत कक्षात जाऊन पाहणी केली. या वेळी तिच्या नातेवाईकांनी दिलेले निवेदन त्यांनी स्वीकारले, पण त्यांनी एवढ्यावर थांबता कामा नये. राज्यात बोकाळलेली गुन्हेगारी प्रवृत्ती त्यांनी ठेचून काढली पाहिजे. मुख्यमंत्री म्हणून त्यांची ती जबाबदारी आहे. गृहमंत्र्यांनीही बेताल विधाने करण्याऐवजी धडक कारवाई केली पाहिजे. तीन पक्षांच्या सरकारकडून अधिक काही होण्याची अपेक्षा मुळीच नाही, परंतु किमान जनतेला निर्भयपणे व महिलांना सुरक्षितपणे जगता यावे यासाठी पावले ही उचलावीच लागतील. अन्यथा नुसते इशारे देऊन, निवेदने स्वीकारून काहीही साध्य होणार नाही. महाराष्ट्रातील ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा पाया घातला त्याच राज्यातील महिला आज असुरक्षित आहेत, ही खेदाची बाब आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply