Breaking News

निर्मनुष्य रस्ते ठरताहेत कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत लॉकडाऊनमुळे सध्या शांतता व रस्ते मोकळे पडले आहेत. प्रत्येकजण घरात राहून समाजमाध्यमांवर आपल्या विविध कलागुण सादर करत आहेत. तर दुसरीकडे रस्त्यांवर राहणारे निराश्रित देखील मागे राहिलेले नाहीत. मात्र त्यांनी अधुनिकतेचा वापर न करता थेट राहदरीमुक्त रस्त्यांनाच आपल्या कलेचे साधन बनवले आहे.  या रस्त्यांवर भली मोठी कल्पनेतील तर काही स्वतःच्या दृष्टीतून पाहिलेली चित्रे खडूने रेखाटत स्वतःचे मनोरंजन करत आहेत. अजतागाय निराश्रित म्हणून हिणावणार्‍या व जगणार्‍या या मुलांतील कलेचे गुण उलगडू लागले आहेत.

गेले 60 ते 70 दिवस लॉकडाऊनमुळे  सर्वच ठप्प झाले आहे.  वर्क फ्रॉम होममुळे नागरिकांना वेळ मिळत असून अनेकांनी या वेळेचा सदुपयोग करत आपल्या विविध कला समाजमाध्यमांवर ऑनलाइन सादर करण्यास सुरुवात केली आहे. त्याचे पेव फुटले आहे. एकबाजूला श्रीमंत वर्ग हातात मोबाइल घेऊन आपली करमणूक करत असतानाच दुसर्‍या बाजूस निराश्रितांच्या मुलांनी मात्र आपले स्वतःचे मनोरंजन करण्यासठी थेट रस्त्याचाच वापर करण्यास सुरुवात केली आहे. निर्मनुष्य रस्ते या मुलांच्या कलात्मतेला वाव देणारे व्यासपीठ ठरू लागले आहेत.

शाळेची पायरीदेखील न चढलेल्या या 9 ते 10 वर्ष वय असलेल्या मुलांनी नेरुळ स्थानकातील रस्त्यांवर मोर, रेल्वे स्थानकात उभ्या असलेली विविध वाहने, सायकल, झाडे, चालणारी माणसे, कुत्रे, ट्रेन, पक्षी, पक्षांचे थवे,सूर्य, चंद्र, चांदण्या, शहरातील इमारतींची आपल्या कुवतीनुसार व कल्पनेनुसार चित्रे रेखाटली आहेत. टेम्पो, कार या वाहनांची चित्रे तर अगदी हुबेहुब चितारली आहेत. मुख्य म्हणजे वहीत एखादे चित्र काढताना रेषा काढताना अंदाज बांधता येतो. मात्र कसलीही फुटपट्टी नसताना निव्वळ अंदाज बांधून कसलाही आधार न घेता भली मोठया  रेषा काढल्या आहेत. हे पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. अगदी लांबलचक भली मोठी चित्रे रेखाटण्यात आली आहेत.

स्थानक परिसरात पाय मोकळे करण्यास येणारे  देखील थांबून या बालवयातील कलाकृतींचे कौतुक करत आहेत. या मुलांनी स्वतःच्या मनात आजवर लपलेल्या कल्पनांना कृतीत उतरवले आहे. यातून नेहमी भिकर्‍याची उपमा मिळालेल्या व तसेच हिणवल्या गेलेल्या या मुलांच्या बुद्धीरुपी ऐश्वर्याचे दर्शन पाहायला मिळत आहे.  सध्या सर्व शाळा ओस पडलेल्या असताना व ऑनलाइन शिक्षण सुरू असताना या रस्त्यांचा वापर शाळेतील फळ्याप्रमाणे होऊ लागला आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply