Breaking News

‘कोरोना’चा कहर!

चीनमध्ये कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत सुमारे पंधराशे जण ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडले आहेत. मृतांचा आकडा सातत्याने वाढत असून, हा विषाणू एव्हाना सर्वत्र पसरू लागला आहे. अर्थात, त्याचा चीनएवढा अन्य कोणत्या देशात प्रादुर्भाव दिसून आलेला नाहीए, परंतु या विषाणूवर अद्याप लस आली नसल्याने संसर्गाचा धोका कायम आहे.

आतापर्यंत बर्ड फ्ल्यू, स्वाइन फ्ल्यू, इबोला, झिका, निपाह, सार्स अशा विविध विषाणूंनी वेगवेगळ्या देशांमध्ये थैमान घातल्याच्या नोंदी आहेत. त्यात आता ‘कोरोना’ची भर पडली आहे. जागतिक दुसरी महासत्ता मानला जाणारा चीन हा देश या असाध्य विषाणूमुळे पुरता कोलमडल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णामध्ये पहिल्या टप्प्यात सर्दी, तापाची लक्षणे आढळतात. त्यानंतर श्वसनाचा त्रास जाणवून परिस्थिती गंभीर बनते. हा विषाणू गेल्या डिसेंबर महिन्यात चीनमधील वुहान प्रांतात सर्वप्रथम आढळला होता. त्यानंतर नववर्षात तो इतर शहरांमध्ये पसरू लागला. चीनव्यतिरिक्त अन्य देशांमध्येही ‘कोरोना’चे रुग्ण दिसून आले आहेत. यात चीनमधून मायदेशी परतलेल्यांचा समावेश अधिक आहे. दरम्यान, या विषाणूचा शिरकाव लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन-व्हू) आणिबाणी जाहीर केली आहे.

कोरोना विषाणू पक्षी, प्राण्यांमधून आल्याचे म्हटले जातंय. दुर्दैवाची बाब म्हणजे ज्यांनी या महाभयंकर विषाणूची सर्वात आधी माहिती दिली त्या चीनमधील डॉक्टरचाही याच विषाणूने जीव घेतला. ‘कोरोना’चे संक्रमण झपाट्याने होत असून, मृतांचा आकडाही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पंधराशे व्यक्तिंचा जीव यामध्ये गेला आहे. काही विश्लेषकांच्या दाव्यानुसार चीनमध्ये आतापर्यंत दीड लाखहून अधिक लोक बाधीत झाले असून, 50 हजारांच्यावर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. असे असेल तर खोटा आकडा सांगून चीन जगाची फसवणूक करतोय का, असा प्रश्न उपस्थित होतो.

सोशल मीडियात आलेल्या व्हीडिओनुसार चीनमध्ये अनेकांना आपल्या घरातच अक्षरश: तुरुंगासारखे डांबले जात आहे. अशा वेळी रहिवाशांनी आम्हाला आपत्कालीन स्थितीत काही मदत हवी असल्यावर ती केव्हा मिळणार असे विचारले असता, तुम्हाला मदत मिळेल, पण ती केव्हा मिळेल हे सांगता येणार नसल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. याबाबत खरे-खोटे तेथील नागरिकांनाच माहीत, मात्र चीनमध्ये ओढावलेली परिस्थिती भयंकर आहे एवढे मात्र निश्चित!

कोरोना विषाणूचा धसका सार्‍यांनीच घेतला आहे. चीनमधून मायदेशी परतलेला केरळमधील रहिवाशी हा भारतातील पहिला रुग्ण ठरला. त्यानंतर देशाच्या अन्य भागातही या विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले असून, सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आंध्र प्रदेशातील एका 50 वर्षीय व्यक्तीने ’व्हायरल फिव्हर’ला ’कोरोना’चा ताप समजून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हैदराबादमधील चित्तूर येथील रहिवासी असलेले कृष्णा गेल्या काही दिवसांपासून तापाने फणफणले होते. या काळात त्यांनी इंटरनेटवर कोरोना विषाणूसंदर्भातील एक व्हिडिओ पाहिला. त्यानंतर आपल्याला याच विषाणूची लागण झाली असल्याचा समज करून कृष्णा हे कुटुंबियांना घरात बंद करून स्मशानात त्यांच्या आईच्या कबरीजवळ निघून गेले. कुटुंबियांनी आरडाओरड करीत शेजार्‍यांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला आणि थेट स्मशान गाठले, मात्र तोवर खूप उशीर झाला होता. कृष्णा यांनी त्यांच्या आईच्या कबरीजवळ असलेल्या एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉक्टरांनी कृष्णा यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केल्यानंतर वैद्यकीय अहवालात त्यांच्या शरीरात ’कोरोना’ची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत.

घटना कुठलीही असो अफवांचे पीक अधूनमधून येतच असते. सोशल मीडियात तर खात्री न करताच अनेक मेसेस फॉरवर्ड केले जातात. अशाच प्रकारे कोरोना विषाणूची लागण टाळण्यासाठी चिकन खाणे टाळावे, अशा आशयाचा मेसेज सध्या फिरत आहे. प्रत्यक्षात चिकन खाल्ल्याने ‘कोरोना’ची बाधा होत नसल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. हो पण मांस-मच्छी चांगल्या ठिकाणाहून खरेदी करून व व्यवस्थित स्वच्छ करूनच पुढील प्रक्रियेसाठी वापरणे कधीही हितकारक. शिवाय घरात पशु-पक्षी असतील, तर अधिक काळजी घेणे आवश्यक बनते. इंग्रजीत एक म्हण आहे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. अर्थात उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला!

‘कोरोना’ने बलाढ्य ‘चिनी ड्रॅगन’ला विळखा घातला आहे आणि या विषाणूला रोखण्यात महासत्ता असलेला देश हतबल झाला आहे. एरवी भारताला जागतिक पातळीवर कमी लेखण्याची एकही संधी चीन सोडत नाही. त्याचप्रमाणे पाकिस्तानखेरिज चीनी सैन्यही भारताच्या अधुनमधून कुरापती काढत असते. एवढेच नव्हे; तर दहशतवाद्यांच्या विरोधातील भूमिका असो वा आण्विक पुरवठा देशांच्या (एनएसजी) गटात समावेश; चीनकडून भारताला नेहमीच आडकाठी केली जाते. तरीही भारताने चीनमधील सध्याची परिस्थिती पाहून खुल्या दिलाने मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिपनिंग यांना पत्र लिहून कोरोना विषाणूच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी भारत सरकार चीनला सहकार्य करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. आता भारताप्रमाणे अन्य देशांनीही चीनच्या मदतीसाठी, तसेच कोरोना विषाणूवर लस वा औषध शोधण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, जेणेकरून जगात फोफावत असलेले हे अरिष्ट दूर होण्यास मदत होईल.

-समाधान पाटील (9004175065)

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply