खालापूर : प्रतिनिधी
आठ महिने उलटूनसुद्धा तहसील कार्यालयाकडे माहिती अधिकारात मागितलेली कागदपत्रे मिळत नसल्याने खालापूर तालुक्यातील माजगावचे शेतकरी निराश झाले आहेत. दलालांसाठी महसूल विभागाकडून कागदपत्रे लगेच उपलब्ध होतात, मात्र शेतकर्यांची दखल घेतली जात नाही, भावना हे शेतकरी व्यक्त करीत आहेत. खालापूर तालुक्यातील माजगाव येथील सुमारे पन्नास शेतकर्यांची दिडशे एकर जमीन तीस वर्षापूर्वी औद्योगिक कारणासाठी धनिकांनी खरेदी केली होती. त्यासंदर्भात जानेवारी 2007मध्ये खालापूर तहसील कार्यालयात संबंधीत शेतकरी आणि खरेदीदारांमध्ये बैठक झाली होती. त्यावेळी जागा विकसित करताना बाधीत शेतकर्यांना रोजगार देवू, असा शब्द जागा खरेदीदारांनी दिला होता, असे शेतकरी जयवंत पाटील यांनी सांगितले. या बैठकीच्या इतिवृत्तातदेखील या चर्चेची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे जागा विकसित करण्यास सुरूवात झाल्यास सर्वाना रोजगार मिळेल या आशेवर शेतकरी होते. मात्र जागा विकसित करणे दूरच राहिले, पण या जागेची परस्पर विक्री सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, या जागेची अनिवासी भारतीयांना विक्री होत असल्याने संबंधीत शेतकर्यांनी न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे. त्यासाठी तहसील कार्यालयात झालेल्या जानेवारी 2007मध्ये झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताची प्रत महत्वाची असल्याने शेतकरी जयवंत पाटील यानी जुलै 2019मध्ये माहिती अधिकारात सदरच्या इतिवृत्ताची प्रत मिळावी, अशी मागणी केली. परंतु आठ महिने उलटूनसुद्धा खालापूर तहसील कार्यालयातून सदर इतिवृत्ताची प्रत मिळालेली नाही. वारंवार चकरा मारूनसुद्धा तहसीलमधून सहकार्य मिळत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत.
जानेवारी 2007मध्ये झालेल्या बैठकीचे इतिवृत्त सापडत नाही, असे खालापूर तहसील कार्यालयातून सांगण्यात येत आहे. मात्र 1992चा बिनशेती विक्रीचा पेपर कर्जत प्रांत कार्यालयातून अवघ्या पंधरा मिनिटात मिळाला. त्यामुळे खालापूर तहसील माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे, असे वाटते.
-जयवंत पाटील, शेतकरी, माजगाव, ता. खालापूर
सदर बैठकीचे इतिवृत्त शोधून द्या, असे आदेश कर्मचार्यांना दिले आहेत. गरज पडल्यास दोन कर्मचारी जास्त घ्या असेदेखील स्टोअरकिपरला सांगितले आहे.
-इरेश चप्पलवार, तहसीलदार, खालापूर