पनवेल : प्रतिनिधी
पावसाळ्यात नदीचे पाणी शहरात शिरून पूरस्थिती निर्माण होऊ नये याकरिता गाढी नदीला संरक्षक भिंत बांधण्याच्या कामास पनवेल महापालिकेच्या मंगळवारी (दि. 18) झालेल्या सर्वसाधारण महासभेत आर्थिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
पनवेल महापालिकेची सर्वसाधारण महासभा मंगळवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी गाढी नदीच्या पूर्व बाजूस 8.5 मीटर आरएलपर्यंत जवळपास 3400 मीटर लांबीची भिंत बांधण्यास, तसेच अतिवृष्टीच्या काळात शहरात साचलेले पाणी नदीमध्ये सोडण्यासाठी स्वयंचलित पंपिंग स्टेशन बांधण्याचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला.
पावसाळ्यात नदीचे पाणी शहरात शिरून पूरस्थिती निर्माण होऊ नये याकरिता गाढी नदीला संरक्षक भिंत बांधण्याच्या कामास आर्थिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या वेळी सभागृहात लावण्यात आलेल्या पडद्यावर संरक्षक भिंत, तसेच पंपिंग स्टेशनबाबतचा आराखडा सादर करण्यात आला.
पालिकेमार्फत ऑगस्ट 2019मध्ये झालेल्या महासभेत पूरस्थितीत अतिवृष्टीचा अभ्यास करण्यासाठी व त्यावर उपाययोजना सूचविण्याकरिता तांत्रिक सल्लागार नेमण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार मे. यश इंजिनियरिंग कन्सल्टन्ट या सल्लगार कंपनीची अहवाल तयार करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. कंपनीने सादर केलेल्या अहवालानुसार सिडकोने बांधलेल्या संरक्षक भिंतीमुळे गाढी नदीचे पाणी पनवेल शहरातील सखल भागात शिरल्याचा अहवाल देण्यात आला आहे.
गाढी नदी किनार्यावरील क्षेत्र सीआरझेडमध्ये असल्याने संरक्षक भिंत बांधण्यासाठी सीझेडएमए कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र, तसेच काही भागात असलेल्या खारफुटीमुळे उपाययोजना राबवण्यासाठी उच्च न्यायालयाची मान्यता घ्यावी लागणार आहे. सल्लागार कंपनीतर्फे देण्यात आलेल्या अहवालात पूरप्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी सूचविण्यात आलेल्या कामांकरिता अंदाजे 131 कोटींचा ढोबळ खर्च गृहीत धरण्यात आला असून, सिडकोच्या भरावामुळे व बांधलेल्या संरक्षक भिंतीमुळे शहरात पाणी घुसत असल्याने 132 कोटी रुपयांचा खर्च सिडकोने करावा, अशी मागणी करणारा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला आहे.
संरक्षण यंत्रणेवर एकूण अंदाजे खर्च 156.48 कोटी, संरक्षक भिंत, तसेच पंपिंग स्टेशनकरिता एकूण 156.48 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च पकडण्यात आला आहे. सिडकोने 131 कोटींचा खर्च उचलण्याची मागणी करण्यात आली असून, इतर कामांकरिता 25.48 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी पालिकेने दाखवली आहे.
इतर भागातील संरक्षक भिंत बांधण्याच्या 25 कोटी रुपयांचा कामाला सुरुवात करण्यात येणार असून, वर्षभरात ही कामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.
महापौरपदाकरिता दुसर्यांदा संधी देण्यात आल्याबद्दल डॉ. कविता चौतमोल, नव्याने उपमहापौरपदी वर्णी लागलेले जगदीश गायकवाड, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेविका रूचिता लोंढे व डॉक्टर झालेल्या मुलीचे अभिनंदन व संविधानाची प्रत देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी बोलताना महापौरपद खुल्या वर्गाकरिता आरक्षित असताना महापौर व उपमहपौरपद अनुसूचित जातीला देणे ही ऐतिहासिक घटना असल्याचे नगरसेवक प्रकाश बिनदार यांनी नमूद करीत पनवेलकरिता ही बाब अभिमानाची असल्याचे मत व्यक्त केले.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …