Breaking News

खालापुरातील कचर्याची विल्हेवाट लावणार्या कारखान्याला ग्रामस्थांचा प्रखर विरोध

खालापूर : प्रतिनिधी

मुंबईतील विविध रुग्णालयांतील जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी खालापूर तालुक्यातील आत्करगाव येथे एसएमएस नावाचा कारखाना येऊ घातला असून, त्याला आत्करगाव, आडोशी, चिंचवली, टेंबेवाडी, होनाड, कुंभेवाडी, आत्करगाववाडी, जंगमवाडी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा विरोध दर्शविला. या संदर्भात ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, खालापूर तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच स्थानिक खासदारांना निवेदन दिले आहे.

जैव वैद्यकीय कचरा निवारण प्रकल्पासाठी एसएमएसएन ओल्वीन प्रा. लि. कंपनीने आत्करगाव (ता. खालापूर) ग्रामपंचायत हद्दीतील जागा (स. नं. 231) खरेदी केली आहे. या कंपनीने सदर प्रकल्प उभारण्यासाठी आत्करगाव ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखलाही घेतला होता. या जागेपासून 200 मी. अंतरावर गाव, नदी तसेच 500 मी. अंतरावर पाझर तलाव, बसस्थानक, हॉटेल, शाळा, कारखाने आहेत. या जागेत जैविक प्रकल्प उभारल्यास तेथील कुजलेल्या कचर्‍यामुळे वायू प्रदूषण होऊन दुर्गंधी पसरेल तसेच नदी, तलावातील पाणी दूषित होऊन ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे 16 मार्च 2020 रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी विरोध केल्यावर या कारखान्याला ग्रामपंचायतीने दिलेला ना हरकत दाखला रद्द करण्याचा ठराव घेण्यात आला होता.

आता हा कारखाना सुरू करण्यासंबंधीच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येताच आत्करगावचे माजी उपसरपंच संदीप पाटील, साजगावचे माजी सरपंच भाऊ गायकवाड, शिवाजी पाटील, निलेश पाटील आदींनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोकण भवन येथील अधिकारी, खालापूर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि स्थानिक आमदार, खासदारांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ग्रामस्थांच्या समस्यांंची कैफियत मांडली तसेच जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी आत्करगाव येथे येऊ घातलेल्या एसएमएस नावाच्या कारखान्याला विरोध दर्शविणारे निवेदन दिले आहे.

जैविक कचर्‍यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने कुठल्याही परिस्थितीत हा कारखाना आत्करगावात येऊ देणार नाही. या नियोजित कारखान्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याची ग्रामस्थांची तयारी आहे.

-संदीप पाटील, माजी उपसरपंच, आत्करगाव, ता. खालापूर

नियोजित कारखान्याच्या प्रदूषणाचा त्रास परिसरातील अनेक गावांना होणार आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकत्रित येत या नियोजित  कारखान्याविरोधात लढा देण्याची वेळ आली आहे.

-शिवाजी पाटील, ग्रामस्थ, आत्करगाव, ता. खालापूर

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 अभंगांचे व्हिडीओ चित्रिकरण

नादब्रह्म साधना मंडळाचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्तथोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply