मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार संवेदनाहीन आहे, अशी टीका भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. आझाद मैदानात 24 दिवसांपासून आंदोलक आंदोलन करीत असूनही त्यांना न्याय मिळत नाही. भाजपची सत्ता असताना राज्यात कुठेही आंदोलन झाल्यास त्याची त्वरित दखल घेऊन मार्ग काढला जात होता, मात्र हे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचेही ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर अनेक विभागांत नोकरभरती झाली. नोकर भरतीच्या सर्व प्रक्रिया झाल्या, मात्र नियुक्त्या झाल्या नाहीत. याबाबत मराठा तरुण गेल्या 24 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले आहेत. या आंदोलनकर्त्यांची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. दरेकर म्हणाले की, गेल्या वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना राज्यात कुठेही आंदोलन, उपोषण झाल्यास दुसर्या-तिसर्या दिवशी स्वत: तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस त्यांना बोलावत होते.