कर्जत : बातमीदार
मिनीट्रेन बंद असल्यामुळे मालवाहू घोड्यांचा दर वाढविण्याचा निर्णय माथेरानमधील मालवाहू घोडेवाल्यांनी घेतला असून, घोडेवाल्यांनी व्यापार्यांना वेठीस धरण्यास सुरुवात केली असल्याबाबतचे लेखी निवेदन येथील व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राजेश चौधरी व त्यांच्या शिष्टमंडळाने येथील अधीक्षक तथा कार्यकारी दंडाधिकारी बापूराव भोई यांना दिले.
मिनीट्रेनमधून माथेरानमध्ये जीवनावश्यक वस्तू आणल्या जातात. त्यासाठी एका घोड्यावर शंभर किलोमागे 180 रुपये घेतले जात होते, मात्र पावसाळ्यामुळे मिनीट्रेन बंद झाल्यामुळे आता माथेरानमध्ये घोड्यावरून माल आणला जातो. त्यामुळे घोडेवाल्यांनी दरवाढ केली असून 200 रुपये प्रति शंभर किलो एका घोड्यामागे आकारत आहेत. त्याला येथील व्यापारी मंडळाने तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत व्यापारी मंडळाने येथील अधीक्षक बापूराव भोई यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी स्पष्ट नमूद केले आहे की, मिनीट्रेन बंद असल्यामुळे घोडेवाले आम्हाला वेठीस धरत आहेत. व्यापार्यांना दुकानात माल आणण्यासाठी काहीतरी नियोजन करावे. आमच्या दुकानात जुना आणलेला माल असेपर्यंत आम्ही दुकाने सुरू ठेवू, मात्र त्यानंतर आम्ही सर्व दुकाने बंद ठेवू. त्यामुळे पर्यटकांना होणार्या त्रासाला येथील स्थानिक प्रशासनच जबाबदार असेल.
व्यापारी मंडळाने हे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे तसेच माथेरानच्या नगराध्यक्षांनाही दिले. या वेळी भाजप शहराध्यक्ष विलास पाटील, माजी नगरसेवक अरविंद शेलार, चंद्रकांत जाधव, सचिव मनोज जांभळे, व्यापारी मुकेश शहा, कुलदीप जाधव यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
मिनीट्रेन बंद झाल्याचा फायदा घोडेवाल्यांनी उचलला आहे. त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता दर वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे व्यापार्यांवर आर्थिक बोजा पडत आहे. गेल्या 18 दिवसांपासून माथेरानमध्ये माल आला नाही. जोपर्यंत दुकानात माल आहे, तोपर्यंत दुकाने सुरू ठेवू. माल संपल्यानंतर माथेरानची सर्व दुकाने आम्ही बंद करू. त्यामुळे पर्यटकांना जो त्रास होईल त्याला स्थानिक प्रशासन जबाबदार असेल.
-राजेश चौधरी, अध्यक्ष, व्यापारी फेडरेशन माथेरान
मालवाहू घोडेवाल्यांनी दरवाढीचा निर्णय घेतला आहे व व्यापार्यांचा माल माथेरान बाजारपेठेत नेला जात नाही. याबाबत आताच निवेदन प्राप्त झाले आहे. याबाबत घोडेवाल्यांबरोबर चर्चा करून मंगळवारपर्यंत काहीतरी तोडगा काढून ही व्यवस्था सुरू ठेवण्यात येईल.
-बापूराव भोई, अधीक्षक, तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी माथेरान