जासई संघर्ष समितीची सिडकोकडे मागणी
उरण : रामप्रहर वृत्त
जासई गावातील शेतकर्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात याव्या, अशा आशयाचे निवेदन बुधवारी (दि. 4) जासई ग्रामस्थ मंडळ संघर्ष समितीने सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक दिले.
निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, सिडकोच्या प्रकल्पाची येथील गावाच्या आजूबाजूला बरीच कामे चालू आहेत. ही कामे चालू करून बराच काळावधी झाला तरी येथील शेतकर्यांचे, ग्रामस्थांचे प्रश्न तसेच पडून आहेत. येत्या पधरा दिवसांच्या समितीने केलेल्या मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा नाईलाजाने सर्व शेतकरी व ग्रामस्थ सिडकोची चालू असलेली सर्व कामे बंद पाडू. ही कामे बंद झाल्याने जे काही नुकसान होईल त्यास सर्वस्वी सिडको प्रशासन जबाबदार असेल.
शेतकर्यांची जी जमिन संपादीत करणार आहात, त्या मोबदल्यात दिला जाणाया विकसित भुखंडाची जागा आणि काळावधी लिहून दयावा. तसेच भूखंड मिळण्याचा डेव्हलपमेंट चार्ज रद करावा. गरजेपोटी बांधलेली सर्व घरे नियमित करावीत आणि वाढीव गावठाण घोषित करावे. 125 प्लॉट उलवे नोडमध्ये देण्यात यावे. ज्यांची जमिन संपादीत केली जाईल त्या जमिनीच्या सातबार्यावर ज्यांची नावे आहेत त्या सर्वांना प्रकल्पग्रस्ताचे दाखले मिळावेत. शेतकर्यांना कोणतीही नुकसान भरपाई न देता कामे सुरू केली आहेत ती थांबवावी. प्रथम नुकसान भरपाई द्यावीनंतर कामे चालू करावीत. प्रकल्पामध्ये स्थानिकांनाच नोकया व व्यवसाय मिळावेत. मैदान, समाजमंदिर, स्मशानभूमी, दफनभूमी आणि पिण्याच्या पाण्याची टाकी यासाठी जागा उपलब्ध करावी या मागण्यांसह अन्य मागण्या नमुद करण्यात आल्या आहे.
या वेळी निवेदन देताना समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, जासई सरपंच संतोष घरत, धर्माशेठ पाटील, यशवंत घरत, संजय ठाकूर, सुनिल घरत, जासई हायस्कूलचे प्राचार्य अरुण घाग, पद्माकर घरत, जितेंद्र पाटील, नुरा शेख आदी उपस्थित होते.