वेलिंग्टन : वृत्तसंस्था
येथे सुरू असलेला कसोटी सामना वाचवण्यासाठी भारतीय फलंदाजांना मोठा संघर्ष करावा लागणार अशी चिन्ह दिसत आहेत. पहिल्या डावात 183 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसर्या डावातही भारताचे चार फलंदाज माघारी परतले आहेत. मयांक अग्रवालचा अपवाद वगळता भारताच्या आघाडीच्या फळीतला एकही फलंदाज त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाही.
मयांकने 58 धावांची खेळी केली, मात्र चार फलंदाज माघारी परतल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी जोडीने अखेरच्या सत्रातली षटके खेळून काढत संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. तिसर्या दिवसाअखेरीस भारत चार गड्यांच्या मोबदल्यात 144 धावांपर्यंत पोहचला होता. अजूनही भारत 39 धावांनी पिछाडीवर असून भारताला न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान निर्माण करण्यासाठी चौथ्या दिवशी आक्रमक खेळ करावा लागणार आहे.
दुसर्या डावात भारतीय सलामीवीरांनी डावाची सावध सुरुवात केली, मात्र ट्रेंट बोल्टने मुंबईकर पृथ्वी शॉला माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर मैदानात आलेल्या चेतेश्वर पुजाराने मयांक अग्रवालच्या साथीने खेळपट्टीवर तळ ठोकत भारताचा डाव सावरला. या दोघांनीही दुसर्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. यादरम्यान मयांकने आपले अर्धशतकही पूर्ण केले, मात्र चहापानाच्या आधीच्या षटकात पुजारा बोल्टच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. चहापानाच्या सत्रानंतर मयांक आणि कर्णधार विराट कोहली हेदेखील माघारी परतल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता, पण अजिंक्य रहाणे-हनुमा विहारीने भारताचा डाव सावरवला. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने तीन, तर टीम साऊदीने एक बळी टिपला.
त्याआधी जसप्रीत बुमराहने तिसर्या दिवसाच्या सुरुवातीलाच वॉटलिंगला माघारी धाडत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला, पण यानंतर कॉलिन डी-ग्रँडहोम आणि जेमिसन यांनी 71 धावांची भागीदारी रचत न्यूझीलंडची बाजू अधिक भक्कम केली. या भागीदारीदरम्यानच यजमान संघाने भारतावर शतकी आघाडी घेतली. रविचंद्रन अश्विनने जेमिसनला माघारी धाडत भारताला यश मिळवून दिले, मात्र ट्रेंट बोल्टने अखेरच्या विकेटसाठीही फटकेबाजी करीत भारतीय गोलंदाजांना चांगलेच झुंजवले. बोल्टने 38 धावा केल्या. भारताकडून इशांतने पाच, अश्विनने तीन, तर बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. आता चौथ्या दिवसाच्या खेळात भारत किती मजल मारतोय यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल.
इशांतची झहीरशी बरोबरी
भारताकडून पहिल्या डावात इशांत शर्माने न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद केला. या कामगिरीसह इशांतने माजी क्रिकेटपटू झहीर खानच्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पाच बळी घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या दोघांनी 11 वेळा अशी कामगिरी केली आहे, तर भारताकडून सर्वाधिक 23 वेळा पाच बळी टिपण्याचा विक्रम कपिल देव यांच्या नावावर आहे.
विराटने टाकले ‘दादा’ला मागे दुसर्या डावात कर्णधार विराट कोहली 19 धावांवर माघारी परतला, पण या छोट्याशा खेळीतही विराटने भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला (7212 धावा) मागे टाकले आहे. भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा दिग्गज सचिन तेंडुलकरच्या (15,921) नावे आहेत.