दुकल अटकेत; बंदुका, काडतुसे व अन्य साहित्य जप्त
कर्जत : बातमीदार
तालुक्यातील खरवंडी आदिवासी पाड्यात सुरू असलेला गावठी कट्टे बनविण्याचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. कारखान्यातून गावठी कट्टे, जिवंत काडतुसे आदी साहित्य नवी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने हस्तगत केले असून, दोन जणांना अटक केली आहे.
नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांनी अवैधरीत्या अग्निशस्त्रे, दारूगोळा तयार व खरेदी-विक्री करणार्यांवर कारवाई सुरू केली आहे. हवालदार सतीश सरफरे यांना पनवेलमधील दांडफाटा परिसरात देशी बनावटीच्या बंदुका विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली होती.
त्यानुसार पोलीस अधिकारी व अंमलदारांनी तेथे सापळा लावून परशुराम राघव पिरकड (वय 40, रा. नानिवली, ता. खालापूर) आणि दत्ताराम गोविंद पंडित (वय 55, मु. खरवंडी, ता. कर्जत) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी बनावटीच्या बारा बोअरच्या 10 बंदुका, दोन काडतुसे, मोबाइल फोन व एक पल्सर मोटरसायकल, तसेच अधिक तपासामध्ये आठ अर्धवट बंदुका व साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींना न्यायालयात हजर केले असता 24 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एक इलेक्ट्रिशन, दुसरा सुतार
आरोपींकडे केलेल्या चौकशीत आरोपी दत्ताराम पंडित याने दहावीनंतर इलेक्ट्रिशनचा कोर्स केला आहे, तर दुसरा आरोपी परशुराम पिरकड हा सुतारकाम करतो. हे दोघे आरोपी पाच-सहा वर्षांपासून पनवेल, खोपोली, कर्जत परिसरातील परवाना असलेल्या बंदुका दुरूस्तीचे काम करीत होते. दोन-तीन वर्षांपासून त्यांनी स्वत:च बंदुका तयार करून विकल्या आहेत. देशी बंदुका बनविण्यासाठी लागणारे साहित्य त्यांनी कुर्ला, कर्जत, खोपोली व चौक या ठिकाणाहून खरेदी केले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.