Breaking News

रायगड जिल्हा नियोजन समितीच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी

रायगड : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्हा वार्षिक योजना 2024-25च्या सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेच्या एकूण 386.06 रुपये कोटीच्या प्रारुप आराखड्यास जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.8) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीस महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, भरत गोगावले, महेश बालदी, महेंद्र दळवी, अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यासह शासकीय विभागांचे विभाग व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
सन 2024-25साठी सर्व यंत्रणांकडून आलेल्या मागणीनुसार प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. नियोजन विभागाने रायगड जिल्ह्याला दिलेल्या वित्तीय मर्यादनुसार जिल्हा नियोजन समितीने 325 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली.
अनुसूचित जाती उपयोजनेच्या 27 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली तसेच आदिवासी उपयोजनेच्या 34.06 कोटींच्या आराखड्यास मान्यता दिली. सन 2024-25साठी या तिन्ही योजनांचा मिळून 386.06 कोटींच्या आराखड्यास समितीने मान्यता दिली.
जिल्ह्याच्या प्राधान्याच्या योजना लक्षात घेता सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी 112.34 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी राज्यस्तरावर केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 9 जानेवारी रोजी होणार्‍या बैठकीत वाढीव निधीसाठी मागणी करण्याचे या वेळी ठरविण्यात आले.
जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 सर्वसाधारणसाठी अर्थसंकल्पीय तरतूद 360 कोटी तरतूद मंजूर करण्यात आली असून 252.08 कोटी इतका निधी प्राप्त झाला होता. या निधीपैकी डिसेंबर 2023अखेर 103.45 कोटी प्रत्यक्ष खर्च झाला असून त्याची टक्केवारी 41 टक्के इतकी आहे. हा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी या वेळी दिले. लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी आपापसातील योग्य त्या समन्वयाने हा निधी जिल्ह्यातील विकासकामांवर विहीत कालावधीत खर्च करावा, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या डिसेंबर 2023अखेरचा आढावा सादर केला. प्रास्ताविक जिल्हा नियेाजन अधिकारी ज.द.मेहेत्रे यांनी केले.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply