Breaking News

मोठे वढाव येथील बांध बंदिस्तीला खांडी

कामाची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील वढाव बोर्झे स्कीममधील खारबंदिस्तीच्या कामाला वारंवार खांडी जाण्याचे प्रकार होत असून, त्यामुळे परिसरातील शेकडो एकर शेतजमीन नापीक होऊन पीक वाया गेले आहे. या खारबंदिस्तीच्या कामाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मोठे वढाव भागातील शेतकर्‍यांनी खारलँड विभागाचे कार्यकारी अभियंता विकास पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अ‍ॅड. आकाश म्हात्रे, माजी निवृत्त अधिकारी कृष्णा वर्तक, दामोदर पाटील, शंकर वर्तक, नंदकुमार मोकल, विकास म्हात्रे, अशोक वर्तक, अशोक मोकल आदी ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता विकास पाटील यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले व मोठे वढाव भागातील शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अन्यथा खारलँडच्या पेण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला.    

 वढाव बोर्झे स्कीममधील चार कोटी सात लाख रुपयांचे काम 24 सप्टेंबर 2018 रोजी मंजूर झाले असून, गोदावरी कन्स्ट्रक्शन या कंपनीने हे काम घेतले आहे. सुमारे दोन वर्षे पूर्ण होऊनसुद्धा 30 ते 35 टक्केदेखील काम झाले नाही. 2019मध्ये येथील बांधबंदिस्तीला खांडी गेल्या व 150 ते 200 एकर शेतजमिनीत खारे पाणी जाऊन शेतकर्‍यांचे पीक वाया गेले आहे. त्याची माहिती खारलँड अभियंत्यांना देऊनसुद्धा त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली नाही.

ठेकेदाराने केलेले काम, त्याचा पाया, उंची व माथा शासनाच्या अंदाजपत्रकाप्रमाणे आहे की नाही याची चौकशी न करता ठेकेदाराला बिले कशी दिली गेली याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी या वेळी ग्रामस्थांनी केली.   

ठेकेदाराविरोधात खारभूमी विकास मंडळ, जलसंपदा विभाग, प्रकल्प संचालक यांना वेळोवेळी निवेदने दिली आहेत, मात्र त्याची दखल घेतली जात नाही, असे सांगून शेतकर्‍यांच्या होणार्‍या नुकसानाची भरपाई कोण देणार, असा सवाल ग्रामस्थांनी केला.

आमदार रविशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 3 डिसेंबर 2019 रोजी पेण प्रांत कार्यालयात झालेल्या सभेत संबंधित एजन्सीकडून काम काढून घेऊन अन्य सक्षम एजन्सीची निवड करण्यात यावी, अशा सूचना आमदार रविशेठ पाटील यांनी दिल्या होत्या, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

मोठे वढाव ग्रामस्थांनी  खारबंदिस्तीसंदर्भात दिलेल्या निवेदनाची माहिती घेऊन पुढील योग्य ती कारवाई केली जाईल.

-विकास पाटील, कार्यकारी अभियंता, खारलँड विभाग, पेण

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply