कृष्णा कोबनाक यांचा आरोप; भाजपचे म्हसळ्यात धरणे आंदोलन
म्हसळा : प्रतिनिधी
जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना-काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांची फसवणूक केली असून या सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढल्याचा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी मंगळवारी (दि. 25) येेथे केला. प्रदेश भाजपच्या आदेशानुसार म्हसळा तालुका भाजपतर्फे मंगळवारी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्या वेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर कोबनाक बोलत होते. भाजपचा विश्वासघात करून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकर्यांचा विश्वासघात केल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. अॅसिड हल्ला, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढल्यामुळे महिला व मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भाजप तीव्र निषेध करीत असल्याचे कोबनाक म्हणाले. या धरणे आंदोलनात भाजपचे तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, माजी तालुका अध्यक्ष शैलेश पटेल, उपाध्यक्ष भालचंद्र करडे, रायगड जिल्हा चिटणीस सरोज म्हशीलकर, सरचिटणीस तुकाराम पाटील, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस महेश पाटील, अल्पसंख्याक अध्यक्ष समीर धनसे, उपाध्यक्ष गणेश बोर्ले, प्रकाश कोठावळे, अनिल टिंगरे, सुनील शिंदे, सुनील विचारे, दुर्जनसिंग राजपूत, मनोहर जाधव, श्रीकांत जंगम, सुबोध पाटील, धर्मा पाटील, शरद कांबळे यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी जिल्हा अध्यक्ष कृष्णा कोबनाक व तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या नेतृत्वाखाली निवासी नायब तहसीलदार के.टी. भिंगारे यांना शासनाविरोधात निवेदन देण्यात आले.