चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
तोक्ते चक्रीवादळामुळे पनवेल महापालिका हद्दीतील अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या घरांची कामे करण्याकरीता आवश्यक असलेली बांधकाम साहित्याची दुकाने सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.
नगरसेविका भोईर यांनी निवेदनात म्हटले आहे की, सोमवारी (दि. 17) तौक्ते चक्रीवादळ अरबी समुद्राच्या किनार्यावर आल्याने या वादळामध्ये कोळी बांधवांच्या बोटींना जलसमाधी मिळालेली असुन, अनेक नागरिकांच्या घराचे पत्रे उडून गेले आहेत. घरांवर झाडे पडल्याने घरांची मोठी पडझड झाल्याने त्यांचे संसार पूर्णपणे रस्त्यावर आलेले आहेत.
सध्या पावसाळा सुरू होत असुन, या नागरिकांची त्यांची घरे पुन्हा नव्याने राहण्यायोग्य होणे अत्यंत आवश्यक आहे, परंतु त्याकरीता आवश्यक असलेली बांधकाम साहित्याची दकाने सुरू नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे बांधकाम साहित्याची दुकाने सुरू ठेवण्याबाबत नागरिक सातत्याने मागणी करीत आहेत. त्याअनुषंगाने बांधकाम साहित्याची दुकाने सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली ठेवण्याकरीता परवानगी देण्यात यावी.
पडलेली झाडे, पालापाचोळा उचला
तोक्ते चक्रीवादळामुळे महापालिका हद्दीतील पडलेली झाडे व पालापाचोळा साफ करण्याबाबतही नगरसेविका दर्शना भोईर यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. तोक्ते चक्रीवादळामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीतील अनेक ठिकाणी झाडांची पडझड झालेली आहे, तसेच झाडांचा पालापाचोळाही रस्त्यावर पडलेला असल्याने ठिकठिकाणी वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील विविध ठिकाणी पडलेली आहे व फांद्या व पालापाचोळा साफ करणे आवश्यक आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध भागात पडलेली झाडे व पालापाचोळा साफ करण्याबाबतचे आदेश संबंधित विभागास तातडीने द्यावेत, अशी मागणी भोईर यांनी केली आहे.