धाटाव, रोहा : प्रतिनिधी
रोह्याच्या धाटाव औद्योगिक क्षेत्रातील रोहा डायकेम कंपनीत बुधवारी (दि. 7) दुपारी एकामागून एक स्फोट झाले. या दुर्घटनेमध्ये एक कामगार जखमी झाला असून कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.
रोहा डायकेम कंपनीच्या प्लांट नंबर दोनमधील कोळसा गोदामात बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास अचानक आग लागली व स्फोटांची मालिका सुरू झाली. या वेळी प्रयाग हशा डोलकर (वय 33, रा. खारापटी) हा कामगार भाजल्याने त्यांनी जीव वाचवण्याची तिसर्या मजल्यावरुन उडी मारल्याने पायाला गंभीर दुखापत झालेली आहे. त्यांना ऐरोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या वेळी स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणला होता तसेच प्रचंड धुराचे लोट दिसत होते. त्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार किशोर देशमुख, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, एमआयआयडीसी सहाय्यक अभियंता विनीत कांदळगावकर यांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रोहा दौर्यावर असलेले भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संजय टंडन, रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार धैर्यशील पाटील, युवा मोर्चा दक्षिण जिल्हा अध्यक्ष अमित घाग, भाजप धाटाव विभाग अध्यक्ष कृष्णा बामणे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस तथा तळ्याचे नगरसेवक रितेश मुढे, नरेश कोकरे, रोहा शहर अध्यक्ष निलेश धुमाळ, भाजप कामगार आघाडी रोहा अध्यक्ष विलास डाके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून आढावा घेतला.
अधिवेशनात मुद्दा उपस्थित करणार -आमदार प्रशांत ठाकूर
रोहा डायकेम कारखान्यातील आग भीषण होती, परंतु परमेश्वरच्या कृपेने कोणतीही जीवित हानी झालेली नाही, मात्र एका कामगाराला दुखापत झाली आहे. अशा आगी वारंवार कशामुळे लागतात? त्यासाठी प्रतिबंधकात्मक यंत्रणा सतर्क आहे का? कारखान्यात धोकादायक परिस्थितीमध्ये पाण्याच्या पाईपलाईन कार्यरत आहेत का? कार्यरत नसतील तर त्या का नाहीत याची फॅक्टरी इन्स्पेक्टर व संबंधित सेफ्टी ऑफिसर्स कारणे शोधतीलच, पण येथील कामगार व आजुबाजूला राहणार्या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आगामी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
Check Also
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ
शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी …