प्रसारमाध्यमांनीही कोरोनासंदर्भातील बातम्या देताना जबाबदारीचे भान काटेकोरपणे बाळगायला हवे. कोरोनाच्या फैलावामुळे निर्माण झालेली परिस्थिती ही अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. ही परिस्थिती हाताळण्यात अडचणी निर्माण होतील अशा कुठल्याही बातम्या या काळात प्रसारमाध्यमांनीही देता कामा नये, तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही यासंदर्भातील संदेश पुढे पाठवण्याचे उद्योग थांबवलेच पाहिजेत. भीती, गोंधळ आणि अज्ञान यातून चुकाच होण्याची शक्यता अधिक.
कोरोना… कोरोना… कोरोना… अवघ्या मानव जमातीच्या अस्तित्वालाच तूर्तास या शब्दाचा विळखा व्यापून उरला आहे. जगभरातील कित्येक देशांपासून भारतातील सामान्यातल्या सामान्य माणसाचे दैनंदिन जीवन कोरोनाने पालटून टाकले आहे. आज प्रत्येकाच्याच दिवसाची सुरुवात आणि अखेरही कोरोनाबाधितांचा आकडा कुठवर गेला याची माहिती घेण्याने होत असावी. बाकीचे सारेच तूर्तास बिनमहत्त्वाचे ठरले आहे. याच चिंतेतून व्हॉट्सअॅपसारख्या समाजमाध्यमावर दिवसभरात सगळेच अनेकानेक फॉरवर्ड्स पुढे सरकवत असतात. यातली बरीचशी माहिती, सूचना, टिप्स या मुळात कोणी लिहिल्या, त्या किती खर्या-खोट्या याचा कुठलाच आगापिछा कुणालाच माहीत नसतो. तरी बरेच जण हे सारे पुढे सरकवण्याचे काम करीत असतात. काय साधते यातून? खरंतर कोरोनासंबंधातील संदेश खातरजमा न करता पुढे पाठवू नयेत, असे आवाहन सरकारी पातळीवरून अनेकदा करून झाले आहे, परंतु त्याचा कुठलाही प्रभाव व्हॉट्सअॅपच्या उत्साही वापरकर्त्यांवर पडलेला दिसत नाही. देशातील लॉकडाऊनची परिस्थिती कुठवर अशीच कायम राहणार, किती लांबणार हाही व्हॉट्सअॅपवर चघळण्याचा सर्वांचाच एक लाडका विषय आहे. लॉकडाऊनचा कालावधी आठवडाभराने वाढणार, तो चार वा आठ आठवड्यांनी वाढल्यास छोटे-मोठे उद्योग किती मोठ्या प्रमाणावर बंद होतील, अशा आशयाच्या बातम्याही काही वृत्तपत्रांनी दिल्या. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा सरकारचा कुठलाही विचार नसल्याचा खुलासा अखेर केंद्र सरकारने अधिकृत पत्रक काढून केला. उत्तर प्रदेशातील बरेली येथे गावी परतणार्या शंभराहून अधिक मजुरांवर चक्क निर्जंतुकीकरणासाठी वापरले जाणारे रसायन फवारले गेले. येत्या काळात भीती व अज्ञानातून अशा चुकांमध्ये वाढच होण्याची शक्यता अधिक आहे. उपरोक्त घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर पसरताच तिथल्या जिल्हाधिकार्यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. वास्तवत: बसगाड्यांच्या निर्जंतुकीकरणाची तयारी ठेवली गेली होती, परंतु अधिकार्यांनी अधिकची खबरदारी म्हणून मजुरांवरच रसायन फवारले. महानगरांतून होणारे मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारही कळकळीचे आवाहन करीत आहेत. महाराष्ट्रात या मजुरांकरिता 262 ठिकाणी मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत. जवळपास 70 हजार मजुरांनी या केंद्रांतून आश्रय घेतल्याचेही सांगितले जाते. दरम्यान, केंद्रानेही देशभरात राज्यांच्या व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्याचे आदेश दिले असून स्थलांतर रोखण्याच्या प्रयत्नांचाच तो एक भाग आहे. कोरोनाचा संसर्ग त्याच्या प्रभावापासून दूर असलेल्या भागात पोहोचू नये याची खबरदारी म्हणून ही उपाययोजना आवश्यकच आहे. स्थलांतरित मजुरांनी तसेच गरजू लोकांनी अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांकरिता गर्दी केल्याचेही दिसून आले आहे. अकस्मातपणे समोर उभा ठाकलेला हा एक प्रश्न आहे. कोरोनाचे संकट असे अनेक नवे प्रश्न भविष्यातही घेऊन येऊ शकेल. त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज होण्याचा एक भाग म्हणूनच अफवांना वेळीच रोखण्याचे काम प्रत्येकानेच जबाबदारीने केले पाहिजे.