कोरोनाचे 29 संशयित विलगीकरण कक्षात; एकही बाधित नाही
उरण : प्रतिनिधी – 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये कलम 144 संचारबंदी लागू करण्यात आली असून, उरण शहरात व तालुक्यातील रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट पसरला असून, हॉस्पिटलसारख्या अत्यावश्यक सेवेसाठी काही प्रमाणात पायी चालत व क्वचित वाहनातून रुग्ण जाताना दिसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकंदरीत संचारबंदीमूळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 21 दिवसांच्या आवाहनाला योग्यतेने प्रतिसाद मिळत आहे. त्यातच सर्वत्र पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आल्याने बहुतांशी नागरिक विनाकारण भटकून पोलिसांच्या दंडुक्याचा मार खायला तयार नसून, संचारबंदीला योग्य प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी घरच्या घरीच राहणे पसंद केले आहे.
देशासह राज्यात कोरोना संसर्गजन्य व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोना बधितांच्या संख्येत वाढ होत असून राज्यात मृतांची संख्या नऊ झाली आहे. उरण तालुक्यात बोकडविरा येथील केअर पॉईंट हॉस्पिटल येथील विलगिकरण कक्षात 18 व जेएनपीटीमधील विलगिकरण कक्षात 11 असे एकूण 29 संशयित कोरोना रुग्ण तपासणीसाठी ठेवण्यात आले असून, तपासणीत त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यातील बहुतेक संशयित हे जहाजवरील काम करणारे व बाहेरून आलेले असल्यामुळे त्यांना येथील विलगिकरण कक्षात चाचणीसाठी आणण्यात आले आहेत. त्यामुळे उरण तालुक्यात अद्याप एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. अशी माहिती उरणचे
तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.
पोलिसांकडून नाश्तावाटप
उरण तालुक्यात नोकरी धंद्यानिमित्त आलेले परप्रांतीय हे शहरापेक्षा ग्रामीण भागात भाडोत्री राहत असून, विशेष म्हणजे अशाप्रकारचे लोक तालुक्यात व्यवस्थित रित्या त्यांच्या भाडोत्री घरांना सुखरूप आहेत. शिवाय तालुक्यातील कोणत्याही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्याची परिस्थिती येथील प्रशासनावर आलेली नाही. शिवाय उरण शहर परिसरात विविध ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांना उरण पोलिसांच्या वतीने मागील तीन-चार दिवस नाश्ता देण्यात येत आहे.