पनवेल : वार्ताहर – पनवेल येथील सिटिझन्स युनिटी फोरम अर्थात कफ या संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कफ नगरमधील बिरमोळे हॉस्पिटल येथे हे शिबिर झाले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे निकष पाळत हे शिबिर झाल्यामुळे कफचे विशेष कौतुक होत आहे.
पनवेलच्या सामाजिक क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव म्हणजे कफ संस्था. समाजावरच्या प्रत्येक संकटाच्यावेळी कफ ही सेवाभावी संस्था हिरीरीने संकट निवारणासाठी सहभागी असते. नागरी हक्क असोत किंवा वैश्विक आपत्ती कफ संस्था त्यांचा खारीचा वाटा अत्यंत प्रामाणिकपणे उचलत असते. सध्या देशात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्तपेढ्यांच्यात असलेला साठा जेमतेम आठवडाभर पुरेल इतकाच आहे. या धर्तीवर शासनाने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कफच्या वतीने काल रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तदानासाठी चार बेड्सची सोय करण्यात आली होती. रोटरी क्लब संचालित लिमये ब्लड बँकेच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. चार रक्तदाते बेड वर तर चार रक्तदाते प्रतिक्षा गृहात असे नियोजन करण्यात आले होते. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यात आली होती. यात 100 रक्तदात्यांनी आगावू सूचना दिल्या होत्या. त्यातील प्रत्येकाला वेळ दिली गेली होती. अशा काटेकोर नियोजनामुळे गर्दी झाली नाही व सोशल डिस्टंसिंग पाळले गेले. प्रत्येक रक्तदात्याने रक्त दान करण्यापूर्वी नवीन चादर टाकण्यात येत होती. तसेच संपूर्ण बेड्चे निर्जंतुकीकरण करण्यात येत होते संस्थेचे सचिव मनोज कोलगे यांनी दिली.
रक्तदात्यांच्या वतीने प्रतिक्रिया देताना भगवान गवस म्हणाले की यावेळी रक्तदान समाधान लाभले. मी नेहेमीच रक्तदान करत असतो, पण यावेळी पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी आवाहन केल्यानंतर देशासाठी काहीतरी केल्याची भावना आहे. कफ च्या वतीने अतिशय सुंदर नियोजन केले होते,त्यांचे अभिनंदन, शिबिर यशस्वी करण्याकरिता मनोज कोलगे, हरेश परुळेकर, नरेश पाटील, मनोज जाजू, संतोष बहिरा, प्रशांत गव्हाणकर यांनी अथक परिश्रम घेतले.
रक्तदान शिबिरास अनुमती देताना प्रशासनाने कोविड-19 च्या प्रादुर्भावाचा विचार करता ज्येष्ठ नागरिक सदस्य व रक्तदाते यांनी सहभागी न होता घरातच थांबावे, अशा सूचना केल्या होत्या. त्या सूचनांचा आदर करत संस्थापक अध्यक्ष अरुण भिसे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक सदस्य आपापल्या घरात राहिले.