कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात सामाजिक आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे आता काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही मोदीजींनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी बुधवारी लोकसभा व राज्यसभेतील विविध पक्षांच्या नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. देशातील एकूण एका व्यक्तीचा जीव वाचवण्याला आपले सरकार प्राधान्य देत आहे, हे मोदीजींचे उद्गार केंद्रातील सरकारचे लक्ष्य स्पष्ट करतात.
लॉकडाऊन संपुष्टात येण्याची 14 तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे सगळ्यांचेच लक्ष लॉकडाऊन संपुष्टात येणार की वाढवले जाणार या एकाच घोषणेकडे लागले आहे. केंद्र सरकारने तूर्तास याबाबत अंतिम घोषणा केली नसली तरी 14 तारखेनंतर लगेचच लॉकडाऊन पूर्णपणे हटवले जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भातील संदिग्धता दूर केली आहे. येत्या 11 तारखेला मोदी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी परिस्थितीबद्दल चर्चा करणार असून त्यानंतरच लॉकडाऊनसंदर्भात महत्त्वाची घोषणा होईल असे दिसते. सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणून निरनिराळ्या राज्यांमधील परिस्थिती जाणून घेण्याचे मोदीजींचे प्रयत्न खूप काही सांगून जातात. निरनिराळ्या क्षेत्रांतील मान्यवरांशीही मोदींनी कोरोनासंदर्भात चर्चा केली असून परिस्थिती सर्वोत्तम हाताळण्याकरिता त्यांच्याकडूनही सूचना मागवल्या गेल्या आहेत. मोदींचे सर्व लक्ष सध्या कोरोनाचा फैलाव रोखणे व त्याकरिता लॉकडाऊनचा उपाय राबवताना सर्वसामान्यांची होणारी गैरसोय कमी करणे याकडे लागले आहे. मोदी ज्या खंबीरपणे कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाचे नेतृत्व करीत आहेत, त्याबद्दल त्यांच्याविषयीची आदरभावना व्यक्त करण्यासाठी देशभरातील लोकांनी पाच मिनिटांकरिता उभे राहून त्यांना नमन करावे अशा स्वरूपाची एक मोहीम काही जणांकडून चालवली जात होती. मोदीपर्यंत त्याविषयीची माहिती पोहचताच त्यांनी ट्विट करून खरोखरंच माझ्याविषयी कुणाला प्रेम असेल व माझा सन्मान करायचा असेल तर किमान कोरोनाचे संकट देशात आहे तोवर त्यांनी प्रत्येकी एका गरीब परिवाराची जबाबदारी स्वीकारावी. माझ्यासाठी याहून मोठा सन्मान अन्य कोणताही असणार नाही, असे उद्गार काढले आहेत. देशासाठी कोरोनाविरुद्धच्या लढाईत दृढनिश्चयाने झुंज देणार्या या महायोद्ध्याच्या आवाहनाला जनतेकडून यापूर्वीसारखाच उदंड प्रतिसाद मिळावा. अलीकडेच मोदींच्या आवाहनानुसार देशभरातील जनतेने ऐक्याचे प्रतीक म्हणून आपापल्या घराच्या दारांखिडक्यांवर मिणमिणते दिवे लावले होते. तत्पूर्वीही मोदींच्या आवाहनानुसार लोकांनी टाळ्या आणि थाळ्या वाजवून कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्य व अन्य अत्यावश्यक सुविधा पुरवणार्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती. मोदींचे हे ताजे आवाहनही परिस्थितीला अनुकूल असेच आहे. लॉकडाऊन लांबल्यास देशातील हातावर पोट असणार्या गोरगरिबांची अवस्था बिकट होणार आहे. सरकारी पातळीवरून अन्नधान्य पुरवले जाणार असले तरी समाजातील सुस्थितीतील व्यक्ती व कुटुंबांनी या खालच्या स्तरातील लोकांना मदतीचा हात दिला तरच अवघा देश कोरोना फैलावाच्या आर्थिक परिणामांपासून वाचू शकेल. कोरोनाचे संकट आणखी गडद होत असताना सर्वच स्तरावरून एकमेकांना सावरण्याची गरज आहे. कोरोनासाठीची टेस्ट मोफत करण्याचे आदेश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. जितक्या मोठ्या प्रमाणात व वेगाने या टेस्ट होतील तितक्याच वेगाने रुग्ण आरोग्यसेवेपर्यंत पोहचतील. सरकारी यंत्रणेने हरतर्हेने हे संकट परतवून लावण्याचे प्रयत्न गेले अनेक दिवस चालवले आहेत. जनतेनेही आतातरी पूर्णपणे गंभीर होऊन आपले सहकार्य देण्याची तितकीच गरज आहे.