Breaking News

आज सिडकोला घेराव

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यासाठी असंख्य भूमिपुत्र धडकणार
  • किमान एक लाख लोकांचा असणार आंदोलनात सहभाग

पनवेल ः रामप्रहर वृत्त
लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून गुरुवारी (दि. 24) सिडकोला किमान एक लाख लोकांचा घेराव घालण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सकाळी 10.30 वाजता आंदोलक सिडकोवर जोरदार धडक देणार असून ‘दिबां’ना स्मृतिदिनी त्यांच्याच शिकवणुकीनुसार विराट आंदोलनाद्वारे अभिवादन करणार आहेत.
भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कष्टकर्‍यांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे, या मागणीसाठी लोकचळवळ उभी राहिली आहे. सर्व स्तरांतून तिला पाठिंबा मिळत आहे. खरंतर ही मागणी सन 2008पासूनची आहे. असे असताना राज्यातील ठाकरे सरकारने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या विमानतळाला देण्यात येईल, असे जाहीर केले असून तसा ठराव राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ
शिंदे यांनी सिडकोमार्फत करून घेतला आहे. त्यास रायगड, ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यांतील ‘दिबा’प्रेमी नागरिकांचा तीव्र विरोध आहे. हा असंतोष 10 जून रोजी मानवी साखळी आंदोलनातून स्पष्टपणे दिसून आलेला आहे.
विमानतळ नामकरणासंदर्भात सर्वपक्षीय कृती समिती आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठकाही झाल्या, मात्र मुख्यमंत्र्यांच्या हट्टामुळे चर्चा फिसकटली. त्यामुळे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला मुख्यमंत्र्यांचा विरोध असल्याचे स्पष्ट असून त्यांच्या हेकेखोर भूमिकेला सर्व स्तरांतून तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. तरीही शिवसेना नेते जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर ठाकरे सरकार 24 जूनचे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांना पुढे करीत आहेत, मात्र कुणी कितीही अडथळा आणला तरी सिडको घेराव आंदोलन होणारच, असा निर्धार लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने केला आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केले जाणार आहे, पण पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर असेल, तर आम्ही रिअ‍ॅक्शन मोडवर असणार आहोत, असा सणसणीत इशाराही आंदोलकांनी शासनाला दिला आहे. पोलीस ज्या ज्या ठिकाणी अडवतील, त्या ठिकाणीही आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले आहे.
10 जूनला झालेल्या भव्य आणि आदर्श अशा मानवी साखळीने संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष वेधण्याबरोबरच वाहवा मिळवली. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून 24 जूनचे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीसोबत विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटना, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, नागरिक, तरुण, महिला, ज्येष्ठ सहभागी होणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
तरुण आक्रमक, महिलाही सज्ज
भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 24 जूनला सिडकोला घेराव घालण्यात येणार आहे. तरुणांची फौज या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावत असताना महिलाही मागे राहिल्या नाहीत. आंदोलनाच्या दिवशीच योगायोगाने वटपौर्णिमा आहे. असे असले तरी भूमिपुत्र सावित्री यंदाची वटपौर्णिमा या आंदोलनातच साजरी करणार आहेत.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply