महाड ः प्रतिनिधी
महाड तालुक्यातील निगडे गावामध्ये मुंबईतून चालत आलेल्या 21 नागरिकांना रायगड जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमध्ये क्वारंटाइन केले आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून या नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले असल्याची माहिती बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एजाज बिराजदार यांनी दिली.
हे नागरिक कामानिमित्त मुंबई या शहरांमध्ये वास्तव्यास असल्याने लॉकडाऊनच्या काळामध्ये समस्या निर्माण होऊ नयेत या कारणास्तव आपल्या निगडे येथील मूळगावी पायी चालत आले. या घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज गिरी, आरोग्य विभागाचे डॉ. एजाज बिराजदार यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच कृष्णा खोत यांच्या मदतीने खबरदारीचा उपाय म्हणून प्राथमिक शाळेतच क्वारंटाइन केले.
निगडे येथील क्वारंटाइन केलेल्या नागरिकांमध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव संदर्भातील कोणती लक्षणे आढळून आली नसल्याचे डॉ. बिराजदार यांनी स्पष्ट करून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. मुंबईमधून निगडे येथे आलेल्या कुटुंबांच्या निवासस्थानामध्ये जागेची कमतरता असल्याने त्यांना शासकीय इमारतींमध्ये होम क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांना आवश्यक असणार्या सर्व सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.