मुंबई ः प्रतिनिधी
राज्य सरकारने मुंबई आणि परिसरातून लोकल ट्रेनने प्रवास करणार्यांसाठी नवे परिपत्रक काढले आहे. यानुसार आता अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही लोकल प्रवासासाठी लसीकरणाचा नियम लागू होणार आहे. याशिवाय लोकल ट्रेनने प्रवास करणार्यांसाठी फक्त एक महिन्याचा पास दिला जात होता. आता तीन महिने, सहा महिने किंवा वर्षभरासाठीही लोकलचा पास दिला जाणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.
याआधी शासनाची गरज म्हणून अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच मुंबई आणि परिसरातून लोकल ट्रेनने प्रवासाला परवानगी देण्यात आली होती, तर ऑगस्ट महिन्यापासून लोकल प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य लोकांना लसीकरणाचा नियम लागू केला होता. ज्यांचे लसीचे दोन डोस झाले आहेत आणि त्यानंतर 14 दिवसांचा कालावधी झाला आहे त्याच नागरिकांना युनिवर्सल पास दिला जात होता. त्याआधारे लोकल ट्रेनने प्रवास करण्यासाठी लोकलचा पास दिला जात होता.
एव्हाना लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले असून लसीकरणाचा वेगही चांगला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही सर्वसामान्य लोकांप्रमाणे लसीकरणाचा नियम लागू करीत असल्याचे शासनाने परिपत्रकात जाहीर केले आहे.
दरम्यान, एका महिन्यापेक्षा जास्त दिवसांचा पास जरी काढता येणारा असला तरी तिकीट मिळण्याची सुविधा अजुनही सुरू करण्यात आलेली नाही. तेव्हा पासचा भूर्दंड सहन करण्यापेक्षा तिकिटाची सुविधा कधी सुरू केली जाते याकडे आता सर्वसामान्य लोकल प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …