श्रीवर्धन ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 मार्चपासून श्रीवर्धन तालुक्यातील सर्व पर्यटन व्यावसायिकांनी आपला व्यवसाय स्वतःहून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पर्यटन व्यावसायिकांनी आपली हॉटेल्स, रिसॉर्ट, लॉज बंद ठेवल्याने पर्यटकांनीही या ठिकाणी येण्याचे कमी केले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर या ठिकाणचे समुद्रकिनारे निर्मनुष्य झाले आहेत.
श्रीवर्धन समुद्रकिनार्यासह श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर, आदगाव, हरिहरेश्वर आदी समुद्रकिनार्यांवरही पूर्णपणे शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळते. श्रीवर्धन शहरात फक्त सकाळी नऊ ते दुपारी एक एवढीच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी वेळ दिली आहे. दुपारी एक वाजता पोलिसांनी मच्छीमार्केटही बंद केले. संपूर्ण शहरात शुकशुकाट पाहायला मिळत होता.