पाली : प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. 15) पाली (ता. सुधागड) येथील ग. बा. वडेर हायस्कुलमध्ये माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. तर पाली तहसील कार्यालयात पत्रकार, खेळाडू आणि समाजसेवकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. ग. बा. वडेर हायस्कुलमध्ये प्रसाद लखीमळे, सुनील थळे, भगवान शिंदे, सुरेश दंत, शांताराम पालांडे या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य के. पी. पाटील, उप प्राचार्य एस. आर. शिंदे, पर्यवेक्षक एस. एल. बेलोसे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. येथील तहसील कार्यालयात झालेल्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात सुधागड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष रवींद्रनाथ ओव्हाळ, खेळाडू अनुज सरनाईक, उपक्रमशील शिक्षक कुणाल पवार, महावितरणचे कर्मचारी रुपेश (नाना) सरनाईक यांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला तहसीलदार दिलीप रायन्नावार, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, पं.स. सभापती साक्षी दिघे, राजेंद्र राऊत, राजेश मपारा व प्रकाश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. पाली ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पोलीस ठाणे आणि शाळा, महाविद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमदेखील सादर करण्यात आले.