Breaking News

रायगड जिल्ह्यातकोरोनाचा तिसरा बळी

कामोठ्यातील पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

पनवेल : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूने तिसरा बळी घेतला आहे. कामोठे येथील पोलीस हेड कॉन्स्टेबलचा रविवारी (दि. 26) एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याआधी जिल्ह्यात खारघर येथील रिक्षाचालकाचा आणि पोलादपूर येथील वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता.
कामोठे येथील 53 वर्षीय हेड कॉन्स्टेबलला कोविड विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान 23 एप्रिल रोजी झाले होते. त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र रविवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. तीन वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यानंतर ते पूर्वीप्रमाणेच कार्यरत होते. शनिवारीच वाकोला पोसीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका हेड कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सलग दुसर्‍या दिवशी पोलिसाचा मृत्यू झाल्याने मुंबई पोलीस दल हादरले आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी ट्विटरच्या माध्यमातून निधनाच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. पोलीस दल त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असे ट्विट पोलीस आयुक्तांनी केले आहे.
महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या काळात पोलीस दिवसरात्र डोळ्यांत तेल घालून पहारा देत आहेत. स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता पोलीस सेवा बजावत आहेत. अशातच दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
पनवेलमध्ये तीन नवे कोरोना रुग्ण
पनवेल : येथील महापालिका क्षेत्रात रविवारी (दि. 26) कामोठे, खारघर आणि पनवेल असे तीन नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तिघेही मुंबईत कामाला आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्त 52 झाले आहेत. पनवेल तालुक्यातील रुग्णांची संख्या 61 झाली आहे, तर रायगड जिल्ह्यातील एकूण आकडा 73वर पोहोचला आहे.
कामोठे येथे राहणार्‍या व मुंबईमध्ये बेस्ट चालक असलेल्या 51 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. मुंबईत सीए म्हणून काम करणार्‍या खारघरमधील 43 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे, तर मुंबईच्या राजेवाडी रुग्णालयात स्टाफ नर्स असलेल्या पनवेल शहरातील 50 वर्षीय महिलेलाही कोरोना झाला आहे. या तिन्ही व्यक्तींना तिच्या कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, पनवेल महापालिका हद्दीतील 659 जणांची टेस्ट केली गेली आहे. त्यापैकी 15 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पोझिटीव्हपैकी 19 जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहेत, तर आतापर्यंत  दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पनवेलच्या ग्रामीण भागात रविवारी कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. ग्रामीणमध्ये नऊपैकी पाच रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply