दोन बोटींवर कारवाई
अलिबाग : प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या काळात बंदी असलेल्या एलइडी दिव्यांचा वापर करीत मासेमारी करणार्या दोन बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. ज्ञानेश्वरी माऊली व भक्त मल्हार अशी या बोटींची नावे आहेत. या बोटी त्यावरील साहित्य जप्त करण्यात आले आहे. रायगडच्या मत्स्यव्यवसाय विकास विभागाने ही कारवाई केली.
गेले महिनाभर लॉकडाऊनमुळे मासेमारी बंद होती. आता शासनाने मासेमारीवरील निर्बंध शिथिल केले असून अटींच्या अधीन राहून मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. काही बोटी मासेमारीसाठी समुद्रात गेल्या आहेत. याचाच फायदा घेत एलइडी मच्छीमार बोटी समुद्रात मासेमारीसाठी उतरल्या आहेत. यातील दोन बोटी मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकांनी हेरल्या. त्यांची तपासणी केली असता बोटींवर एलइडी मासेमारीसाठीचे साहित्य आढळून आले. या बोटी तसेच त्यावरील सहा एलईडी बल्ब, दोन सब मर्सिबल पंप, एक जनरेटर व एक एलइडी फोकस असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
शासनाने नियम व अटींच्या अधीन राहून लॉकडाऊनच्या काळात मासेमारीला परवानगी दिली आहे. या बोटींवर नियमांचे पालन होते की नाही यावर आमचे लक्ष आहे, असे मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त सुरेश भारती यांनी संगितले.