सुरक्षा रक्षक नसल्याने कर्मचारी हतबल
मुरूड : प्रतिनिधी
येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका मद्यपी रुग्णाने मंगळवारी मध्यरात्री (दि. 8) रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना घडली. रुग्णालयात एकही सुरक्षा रक्षक नसल्यामुळे त्याला कोणी रोखू शकले नाही. दरम्यान, या आरोपीवर मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारूच्या नशेत असलेला रुग्ण मंगेश शंकर जगताप (वय 38, रा. मुरूड) सोमवारी सकाळी 10 वाजता उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला होता. हा रुग्ण मानसिकरित्या शुद्धीत नसल्याने त्याला डॉक्टरांनी संदर्भ चिठ्ठी देऊन अलिबाग येथे जाण्यास सांगितले, मात्र तो जाण्यास तयार नव्हता. रुग्णालयात एकही सुरक्षा रक्षक नसल्यामुळे त्याला कोणी बाहेर काढू शकले नाही. हा
रुग्ण रात्री रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घालत राहिला.
मध्यरात्री 2.30च्या सुमारास त्याने लोखंडी रॉडच्या साहाय्याने सामान्य वॉर्ड, प्रयोगशाळा, तातडीचा विभाग व प्रसूती रूममधील सर्व दरवाजे आणि खिडक्यांच्या काचा फोडल्या तसेच प्रयोगशाळेतील कपाट, फ्रीज व इतर साहित्याची तोडफोड केली. बाहेर ठेवलेले पाण्याचे कूलर तोडले. प्रसूती रूममधील सर्व साहित्याची नासधूस केली. एवढेच नव्हे तर त्याने लोखंडी रॉड घेऊन रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या महिला कर्मचार्यांच्या अंगावर धाव घेतली. रुग्णालयात काम करणार्या बहुतांश महिला कर्मचारी असल्याने त्याला कोणीच अडवू शकले नाही. याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. विजय हाडबे यांनी मुरूड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याबाबत जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. माने यांची भेट घेऊन मुरूड ग्रामीण रुग्णालयाबाबत झालेल्या प्रकाराची माहिती दिली असता त्यांनी लवकरच सुरक्षा रक्षक पद भरले जाईल तसेच झालेल्या घटनेचा अहवाल घेऊन पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.
डॉक्टर, कर्मचार्यांची सुरक्षा रामभरोसे!
ग्रामीण रुग्णालयात सुरक्षा रक्षकांच्या एकूण दोन जागा शिल्लक आहेत, पण मागील काही वर्षांपासून या जागाच भरल्या नाहीत. त्यामुळे डॉक्टर व कर्मचार्यांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे मागील तीन महिन्यांच्या काळात रुग्णालयाला पाणीपुरवठा करणारी मोटार चोरीला गेली तसेच कर्मचारीवृंदाच्या दोन मोटरसायकलीसुद्धा चोरीला गेल्या आहेत. येथे बहुतांश कर्मचारी महिला आहेत. रात्री-अपरात्री या महिला असुरक्षितपणे काम करतात.