Breaking News

राज्यात पोलीस बदल्यांचे रॅकेट

फडणवीसांचा गौप्यस्फोट; मुख्यमंत्री ठाकरेंनी पांघरूण घातल्याचाही आरोप

मुंबई ः प्रतिनिधी
परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारविरोधात आणखी गौप्यस्फोट केला. राज्यात पोलीस बदल्यांचे रॅकेट कार्यरत होते. त्या संदर्भात फोन टॅपिंग करण्यात आले, मात्र सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणावर पांघरूण घातले, असा दावा फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 23) पत्रकार परिषदेत केला. त्याचबरोबर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केंद्रीय गृहसचिवांकडे करणार असल्याचेही ते या वेळी म्हणाले.
गुप्तचर विभागाच्या आयुक्तांना पोलीस दलात बदल्यांसाठी रॅकेट कार्यरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यासाठी थेट अधिकार्‍यांशी बोलणी सुरू होती. ही बाब गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालकांना ही माहिती दिली. पोलीस महासंचालकांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला विनंती करून या सर्व लोकांच्या कॉल इंटरसेप्शनची परवानगी मागितली होती. ही परवानगी मिळाल्यानंतर कॉल रेकॉर्डिंगमध्ये स्फोटक माहिती समोर आली. बदल्यांच्या रॅकेटमध्ये अनेक मोठे अधिकारी आणि राजकीय लोकांची नावे समोर आली होती, असे फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, रश्मी शुक्ला यांनी 25 ऑगस्ट 2020 रोजी ही माहिती पोलीस महासंचालकांना दिली. 26 तारखेला पोलीस महासंचालकांनी ही माहिती तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवली. या सगळ्या प्रकाराची सीआयडीकडून चौकशी होणे गरजेचे असल्याचे पोलीस महासंचालकांनी आपल्या अहवालात म्हटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याविषयी समजल्यानंतर त्यांनीही चिंता व्यक्त केली, मात्र यावर कारवाई करण्याऐवजी हा अहवाल त्यांनी गृह विभागाकडे पाठवला. ही माहिती बघितल्यानंतर गृह मंत्रालयाने कारवाई करणे सोडाच, पण गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्तांनाच शिक्षा केली. त्यांना अपेक्षित बढती मिळाली नाही. त्यानंतर गुप्तचर विभागाच्या डेटामध्ये नमूद केल्याप्रमाणेच पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या.
फोट टॅपिंगचा डेटा उपलब्ध
पोलिसांच्या बदल्यांमधील घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांनी पांघरूण घातले. पोलिसांच्या बदल्यांच्या घोटाळ्यांसंदर्भात फोन टॅपिंगचा 6.3 जीबी इतका डेटा माझ्या हातात लागलेला आहे. या प्रकरणी पोलीस महासंचालकांनी ताबडतोब कारवाई करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला, मात्र 25 ऑगस्ट 2020पासून आतापर्यंत काहीच कारवाई झाली नाही. हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी कारवाई का केली नाही, उलट हे गृहमंत्र्यांकडेच का पाठवले, असा सवाल फडणवीस यांनी केला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply