सिंदबादच्या सुरस आणि चमत्कारिक कथा किंवा हातिमताईचे चक्रावून टाकणारे प्रश्न किंवा कापूसकोंड्याची कधीही न संपणारी गोष्ट आजपर्यंत आपण ऐकली आहे, पण आता या सगळ्या पलीकडची मती कुंठीत करणारी मानवी प्रचलित विचारप्रणालीच्या पलिकडची कथा आज नव्याने घडते आहे. त्याचे नाव कोरोना…
डोळ्यालाही न दिसणार्या जिवाणूमध्ये विध्वंसक परमाणूची शक्ती पेरून सर्व जगाला त्राहिमाम करायला लावणार्या या विषाणूंची निर्मिती कोणाची हा एक प्रश्न अजून अधांतरीच आहे. या प्रश्नाची जी उत्तरे दिली जातात ती संदिग्ध आहेत ज्याला कोणताही ठोस पुरावा आजपर्यंत तरी उपलब्ध नाही. म्हणूनच सर्व शास्त्रज्ञांना विचारावसं वाटतं की, जसं माणूस हा काळानुरूप उत्क्रांत होत गेलेला जीव आहे. थोडक्यात माणूस हा ईश्वरनिर्मित नाही तर ईश्वर मानवनिर्मित आहे हे निर्विवाद सत्य सर्व जगाने स्वीकारले तद्वत हा कोरोना विषाणू ही निसर्गनिर्मित आहे की मानवाने प्रयोगशाळेत केलेली क्रूर निर्मिती आहे याचं लॉजिकल आणि ऑथेंटिक उत्तर जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, पण प्राप्त परिस्थितीत सर्व जगातून येणार्या बातम्या ओरडून ओरडून हेच सांगत आहेत की या सैतानी विषाणूची हेतूपुरस्सर केलेली क्रूर निर्मिती ही चिनी ड्रॅगनने जगाला दिलेली भेट आहे आणि ही भेट सार्या जगाचा गळा घोटायला सज्ज आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून पहिले महायुद्ध सन 1914 ते 1919 व दुसरे महायुद्ध सन 1939 ते 1945पर्यंत जागतिक राजकारण तेलाच्या स्वामित्व हक्काभोवती फिरत होतं. औद्योगिक क्रांतीनंतर कोळशाला सशक्त पर्याय म्हणून तेल उत्पादनाकडे जग वळू लागलं. त्या अनुषंगाने युरोप व इतर विकसित देशांत ऑटोमोबाइल इंडस्ट्री, इन्फ्रास्ट्रक्चर्स विकसित होऊ लागले. विमान उडू लागली. ऑईल हा परवलीचा शब्द होता. पाण्यापेक्षा तेलक्षुधा मोठी होती.
या सर्व पार्श्वभूमीवर भारताचा विचार केला तर भारत फारच बाल्यावस्थेत होता. तो पारतंत्र्यात तर होताच, पण त्याहीपेक्षा तो शेतीप्रधान होता. इंग्रजांमुळे औद्योगिक क्रांतीचे सुतोवाच झाले होते. इतकेच त्यामुळे ही दोन्ही महायुद्धे व त्यानंतर आलेली महामंदी याची प्रत्यक्ष झळ भारतीयांना बसली नाही. 1990पर्यंत जेव्हा जेव्हा जगामध्ये मंदीची लाट उसळली तेव्हा तेव्हा भारत तरला. अगदी एकीकडे अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशाच आर्थिक कणा असलेली लेहमन ब्रदर्स ही बँक बुडीत निघाली तेव्हाही भारताचा जीडीपी पाचच्या आसपास होता. याचं कारण भारताची मिश्र अर्थव्यवस्था, पण 1990नंतर आलेल्या जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे व इंटरनेटच्या महाजालात पुढे भारताला आपली दारे सताड उघडी करावीच लागली. त्या अगोदर 40 वर्षे टप्प्याटप्प्याने महात्मा गांधीप्रणित ग्रामीण अर्थव्यवस्था आपण पंचवार्षिक योजनांचे गाजर दाखवत केव्हाच गुंडाळली होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बँक इंटरनॅशनल, स्टॉक एक्स्चेंज, डॉलर्स आणि युरोच्या भावातले चढ-उतार याचा जाणवण्याइतका परिणाम आता थेट भरतीयांच्या जीवनावर होऊ लागला. या आर्थिक धोरणाबरोबर हातात हात घालून आला चंगळवाद. पाश्चिमात्य राहणीमान आचार-विचार आणि आहार सारेच सॅटॅलाइट वाहिन्यांच्या माध्यमातून भारतीयांच्या माजघरापासून स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलं. सण, धर्म, कपडे, रितीरिवाज सगळ्यांनाच ग्रासून टाकलं आणि याचा सर्वांत जास्त फायदा उठवला चीनने. होळीचा रंग, पिचकारीपासून दिवाळीच्या आकाशकंदिलापर्यंत; सौंदर्यप्रसाधने यापासून फुलं, फ्लॉवर पॉट, इतर शुभेच्छा वस्तूंपर्यंत; मोबाइलपासून हॉस्पिटलमधील सॅनिटायझरपासून व्हेंटिलेटरपर्यंत; केमिकल इंडस्ट्रीमधील रॉ मटेरियल असो किंवा शालोपयोगी वस्तू वा नूडल्स शेजवान चटणीपासून मोमोपर्यंत प्रत्येक ठिकाणी हिने मुसंडी मारली आणि बघता बघता आपण चिनी बाजारपेठेचे गुलाम झालो. सुदैवाने आपल्या पिढीने पहिली दोन महायुद्ध ना पाहिली ना अनुभवली, पण दुर्दैवाने आपल्या पिढीला तिसर्या महायुद्धाला सामोरं जायचं आहे.
तिसर्या महायुद्धाची सुरुवात जानेवारी 2020पासून झालेली आहे. या युद्धात मिसाईल आणि रणगाडे चालणार नाहीत. वसाहतवादी वृत्तीतून एकमेकांचा भूभाग गिळंकृत केला जाणार नाही, तर इथे घास घेतला जाईल अर्थव्यवस्थेचा. अर्थकारण हा या युद्धाचा पाया असेल आणि हे युद्ध सार्या जगावर लादले ते चीन या राक्षसी महत्त्वाकांक्षा असलेल्या देशाने. तीन टप्प्यांमध्ये त्याला हे तिसरे महायुद्ध जिंकायचं आहे.
पहिला टप्पा (जिवाणू निर्मिती आणि त्याचा प्रसार) : प्रयोगशाळेत तयार झालेला विषाणू वुहानच्या वेट मार्केटमध्ये म्हणजे जिथे 100 तर्हेच्या पशु व पक्ष्यांचे मास मिळू शकते अशा मार्केटमध्ये हा विषाणू पोहोचला. या मार्केटमध्ये काम करणारी एक महिला टॉयलेटमध्ये गेली. हे टॉयलेट वटवाघळाचे पंख, पीस व इतर अवयवांमुळे तुंबलेलं होतं. तिथे या विषाणूची बाधा त्या बाईला झाली. ही पहिली कोरोना रुग्ण होती. महिना होता डिसेंबर 2019. पुढे संक्रमण फोफावलं, मात्र ते लपून ठेवण्यात आले ‘डब्ल्यूएचओ’सारख्या जबाबदार संघटनेने परस्परविरोधी स्टेटमेंट करून संभ्रम आणखी वाढवला. कधी सांगितलं हा फक्त प्राण्यांपासून संक्रमित होतो, तर कधी सांगितलं यात तथ्य नाही. कधी हा साथीचा रोग नाही, असंही सुरुवातीला भासवलं. तोपर्यंत चीनच्या आंतरराष्ट्रीय सीमा मोकाट होत्या. तीन महिने अगदी मार्च 2020पर्यंत चीनमधून लागण झालेले रुग्ण सार्या जगभर पसरत होते.
कोरोनाचा प्रसार अगदी व्यवस्थित होत होता. त्यात चीनचा छुपा अजेंडा होता की याची जास्तीत जास्त झळ जी-7 देश म्हणजेच अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी, इटली आणि जपान या देशांना बसावी. आजच्या आकडेवारीवर दृष्टिक्षेप टाकला, तर या जी-7 देशांत कोरोनाच थैमान थरकाप उडविणारे आहे. सुरुवातीपासूनच चीन हा हुकूमशाही विचारप्रणालीचा देश आणि तीच त्याची राजकीय व्यवस्थाही आहे. परिणामी ह्यूमन राइट्स माणसाच्या मूलभूत जाणिवा सर्रास पायदळी तुडवल्या जातात. राष्ट्रहितासमोर माणसाचा जीव हा गौण समजला जातो. त्याची प्रचिती मावोचा लाँग मार्च असो तियानमेन चौकातील हजारो युवकांचे शिरकाण असो किंवा चीनचे तिबेट आणि तैवानमध्ये हातपाय पसरणे असो याची प्रचिती सार्या जगाने घेतलेली आहे. तिथे आजच्या या कोरोना संक्रमणात चीनला आपल्याच नागरिकांची चिंता असणे हे मानणे भाबडेपणाचे ठरेल. उदाहरणार्थ चीनमधील मोबाईल नेटवर्कच्या कंपनीचा अहवाल असा आहे की फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा व मार्चचा पहिला आठवडा या पंधरा दिवसांत 80 हजार मोबाइलधारक अचानक मोबाइल वापर करायचे थांबले. त्यांनी ना आपले नेटवर्क थांबवण्यासाठी अर्ज केला किंवा ना दुसर्या नेटवर्कमध्ये आपलं कनेक्शन पोर्टेबल केलं. मग 15 दिवसांत ही 80 हजार माणसं अचानक गेली कुठे? याचे उत्तर कुणाकडेच नाही. यावरून चीन या जीवाणू युद्धाची तयारी कशा पद्धतीने करीत आहे याचा अंदाज घेऊ शकतो.
टप्पा दुसरा (जागतिक अर्थव्यवस्था दुबळी करणे) : कोरोना या विषाणूची दहशत एवढी प्रचंड आहे की, त्याचा थेट परिणाम होतो तो माणसाच्या मनोधैर्यावर. कोरोनाच्या सावटाखाली असलेला माणूस आपली क्रयशक्ती हरवून बसेल. त्याचा परिणाम त्या देशाचे वर्किंग अवर्स कमी होतील. मग त्याचा परिणाम औद्योगिक उत्पादन व शेती उत्पादनावर होईल. अर्थचक्र मंदावेल किंवा थांबेल. भांडवली बाजारात म्हणजे शेअर मार्केटमध्ये इथे पैसा फिरता राहणार नाही. एकीकडे काम करणारे हात नाही म्हणून उत्पादन नाही.
उत्पादन नाही म्हणून पगार नाही. पगार नाही म्हणून पर्चेसिंग पॉवर नाही. म्हणून पुन्हा तेच पैसा फिरता राहणार नाही. केवळ सर्विस इंडस्ट्रीवर कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था किती दिवस तग धरू शकेल. अर्थव्यवस्था जेव्हा दुबळी होते तेव्हा वर्गसंघर्ष जोर धरतो आणि आर्थिक विषमता थेट अधोरेखित होते. परिणामी वर्गसंघर्षाबरोबर स्थापित सरकारविरोधी अंतर्विरोध वाढू लागतो. म्हणजेच आर्थिक असमतोलाबरोबर राजकीय अस्थिरता वाढीला लागते. अशा वेळेस वांशिक, धार्मिक दंगली, दहशतवाद, सीमेवरची घुसखोरी, छुप्या मार्गाने येणारी शस्त्रास्त्रे याला मोकाट रान मिळतं. अशा वेळेस देश कोलमडून पडायला कितीसा वेळ लागणार? हाच चिनचा दुसर्या टप्प्यातील मनसुबा आहे. टप्पा तिसरा (प्रत्यक्ष-युद्ध आर्थिक व मैदानी) : सायन्स टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीज ग्रीकल्चर शस्त्रास्त्र या सर्व स्तरावर चीनला आपली शक्ती वाढवायला पूर्ण वेळ मिळेल. तोपर्यंत त्यांना स्पर्धाच उरलेली नसेल. चीनही ही एकमेव महासत्ता जगात अस्तित्वात असेल अशा वेळेस या अक्राळविक्राळ ड्रॅगनला गलितगात्र झालेल्या देशांना गिळंकृत करायला कितीसा वेळ लागेल. कित्येक देश एकही गोळी न झाडता एकही बॉम्ब न टाकता चीन स्वतःच्या ताब्यात घेऊ शकेल.
उपसंहार-वेद, पुराण, उपनिषद, महाकाव्य यांची वैचारिक व अध्यात्मिक बैठक लाभलेला देश म्हणजे आपला भारत. अहिंसा परमो धर्म हेही वैशिष्ट्य आहे. गौतम बुद्धाची शिकवण सत्य, अहिंसा, प्रेम, शील आणि प्रज्ञा ही पंचशील तत्वही गौतम बुद्धाने भारताला दिली. या वैचारिक बैठकीचे तेज सार्या जगाने पाहिले आणि आपणही या तत्त्वांचा अंगीकार करून आजपर्यंत असंख्य वावटळातून तरून गेलोय. आजच्या कठीण आणि कसोटीच्या काळात कोरोना नावाच्या ड्रॅगनला हरवायचं असेल तर हाती शस्त्र घ्यावाच लागेल आणि ही शस्त्रं असतील विवेक, संयम, अनुशासन, परिश्रम आणि धैर्य. आजच्या घडीची पंचशील तत्व हेच आपल्याला वाचवतील आणि पुन्हा एकदा आपण आपला आणि आपल्या देशाचा उन्नयन साधू. आजपर्यंत इतिहासाची पाने उलटताना डीसी म्हणजे बिफोर क्राइस्ट व एसी म्हणजे आफ्टर क्राइस्ट असा इतिहास उलगडला जात होता, पण इथून पुढे इतिहास बीसी म्हणजे बिफोर कोरोना आणि एसी म्हणजे आफ्टर कोरोना अशा पद्धतीने सांगितला जाईल आणि लिहिलाही जाईल, पण या इतिहासावर एक सुज्ञ भारतीय म्हणून मोहोर उठवायची आहे. चला उठा एकमेकांचा हात हाती घ्या आणि म्हणा एकमेंका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ!
-महेंद्र कुरघोडे, पनवेल (मोबा. क्र. 9869212939)