Breaking News

भारताला सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

यंदाचा अर्थसंकल्प भारताला आत्मनिर्भर बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. देशात सुरू असलेल्या सुधारणांचा उद्देश हा भारताला जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनवणे हा आहे, असा निर्धार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. त्या शनिवारी (दि. 13) लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलत होत्या.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, कोरोनाचे एवढे मोठे संकटही सरकारला आपल्या सुधारणांचा कार्यक्रम राबवण्यासाठी आळा घालू शकले नाही. अनेक तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारताचा उद्देश साध्य करण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल.

‘जगातील अनेक देशांत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रकोप सुरू आहे, पण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारने यावर मात करून सातत्याने अर्थव्यवस्थेचा विकास साधला आहे,’ असे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले.

प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसवर टीका करताना अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या पक्षाने 1991 साली आर्थिक सुधारणांचा विचार केला आणि आता तेच या सरकारला सुधारणांच्या मुद्द्यावरून सातत्याने प्रश्न विचारतात.

राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात शेतकरी आणि संपत्ती निर्माण करणार्‍या उद्योगपतींची गोष्ट केली. उद्योगपतींच्या योगदानाशिवाय अर्थव्यवस्था कशी चालेल, असा प्रतिप्रश्न करून सीतारामन म्हणाल्या की, या अर्थसंकल्पामध्ये कृषीवरील खर्चात कपात का करण्यात आली आहे, असा सवाल सातत्याने विचारण्यात येतोय, पण ही गोष्ट दिशाभूल करणारी आहे. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 10.75 कोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यांमध्ये 1.15 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.

काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचे वचन दिले होते. त्यावरून काँग्रेसने यू-टर्न का घेतला हे राहुल गांधी सांगतील अशी मला अपेक्षा होती. त्याचबरोबर मध्य प्रदेश आणि राजस्थानात सरकार आल्यानंतर कर्जमाफी करण्याची घोषणा काँग्रेसने केली होती. मध्य प्रदेशात सत्तेत असताना काँग्रेसने कर्जमाफी का केली नाही. राजस्थानात काँग्रेस सत्तेत आहे. तेव्हा काँग्रेस का कर्जमाफी करीत नाही, असा सवालही अर्थमंत्र्यांनी केला.

अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांवर भाष्य करीत सरकारवर टीका केली होती. राहुल यांनी केलेल्या टीकेवरून केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी या वेळी घणाघाती हल्ला केला. अर्थमंत्र्यांनी राहुल हे खोट्या कथा सांगत आहेत, ज्यामुळे भारताचा अपमानच होत आहे, असे म्हटले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply