Breaking News

घारापुरी, पीरवाडी किनार्‍यावरील पर्यटन व्यवसायाला लॉकडाऊनचा फटका

उरण : प्रतिनिधी

लॉकडाऊन संचारबंदी दरम्यान घालण्यात आलेल्या बंदीमुळे उरण तालुक्यातील घारापुरी, पीरवाडी आदी पर्यटक आधारित व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे मागील 45 दिवसांपासून बंद पडलेल्या व्यवसायामुळे शेकडो लघु उद्योग व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे तिसर्‍यांदा लॉकडाऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मागील 45 दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका उरण परिसरातील पर्यटन आधारित लघुउद्योजकांनाही बसला आहे.

 येथील जगप्रसिद्ध घारापुरी बेटावर पर्यटकावर आधारित सुमारे 250 लघु व्यावसायिक व्यवसाय करुन आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत आहेत. लॉगडाऊन संचारबंदी दरम्यान दररोज गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथुन बेटावर येणारे 25 ते 30 लाँचेस मधुन हजारो देशी विदेशी पर्यटक बंद झाले आहेत. पर्यटकांना घेऊन येणार्‍या लॉचेसही बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे संचारबंदी लॉकडाऊनमध्ये एकही पर्यटक बेटावर पोहचला नाही. नेहमीच पर्यटकांमुळे गजबजलेल्या बेटावर आता नीरव शांतता पसरली आहे. त्यामुळे बंद पडलेल्या व्यवसायामुळे शेकडो लघु उद्योग व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. या सर्वांनाच आता तिसर्‍यांदा लागु करण्यात आलेल्या संचारबंदी, लॉकडाऊनची बंदी उठण्याची प्रतिक्षाच लागुन राहिली आहे. त्याचप्रमाणे संचारबंदी लॉकडाऊन दरम्यानच्या बंदीमुळे येथील पीरवाडी बीचवरील व्यवसायही ठप्प झाला आहे. पिरवाडी बीच आणि दर्गा पाहण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल आदी ठिकाणांहून दररोज येणारे पर्यटकही येईनासे झाले आहेत. त्यामुळे नेहमीच पर्यटकांनी गजबजलेले पीरवाडी बीच सध्या सुनसान झाले आहे. परिणामी पीरवाडी बीचवरील व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याने त्यांच्यावरही आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अशाच उपासमारीच्या संकटाचा सामना करण्याची वेळ उरण परिसरात असलेल्या 2500 रिक्षा चालकांवरही येऊन ठेपली आहे. रिक्षा व्यवसायच ठप्प झाल्याने रिक्षाचे मासिक हप्ते आणि कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालविणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे रिक्षा चालकांच्या वतीने काही संघटनांनी रिक्षा सुरू करण्यासाठी पोलीस आयुक्तांना साकडे घातले आहे.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply