भाषावार प्रांतरचना तत्त्वानुसार स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याला पुढील वर्षी 1 मे या दिवशी 60 वर्षे पूर्ण होतील. ह्या निमित्ताने महाराष्ट्राची नवी आणि खरी ओळख सगळ्या देशाला करून देता येईल. ज्ञान, पराक्रम आणि सेवा ह्या तीन क्षेत्रात मराठी माणसाने अनेक वेळा राष्ट्रीय पातळीवर स्फूर्तिदायक आणि स्थायी स्वरूपाचे नेतृत्व आघाडीवर राहून केले आहे. न्यायमूर्ती रानडे, ज्ञानकोशकार केतकर, इतिहासकार वि. का. राजवाडे, साहित्यसम्राट न. चिं. केळकर, महामहोपाध्याय पां. वा. काणे आणि बाबासाहेब आंबेडकर येथपासून तो अगदी दुर्गा भागवत आणि रा. चिं. ढेरे याच्यापर्यंत अनेक क्रियावान पंडितांनी आणि विदुषींनी समाजाचे चलनवलन ज्ञानाधिष्टित होईल ह्याची सतर्क राहून काळजी घेतली आहे. वयाच्या तेविसाव्या वर्षी लंडनच्या गुहेत जाऊन आणि इंग्रजांच्या छाताडावर बसून सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान आणि परंपरा पुनरुज्जीवित आणि स्थिर केली. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातील सर्वोच्च पराक्रम आणि सर्वोच्च त्याग त्यांच्या मार्सेलिसच्या समुद्रउडीने आणि अंदमानातील जन्मठेपीने अधोरेखित केला आहे. ते महाराष्ट्राला भारताचा खड्गहस्त म्हणत. महर्षी कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, गाडगेमहाराज येथपासून तो शिवाजीराव पटवर्धन आणि बाबा आमटे यांच्यापर्यंत अनेक समाजसुधारकांनी निरलस सेवाकार्याचे आदर्श उभे केले आहेत. शिवाजी, टिळक आणि सावरकर यांनी तर बाराशे वर्षे पारतंत्र्यात राहिलेल्या समाजाचे नेतृत्व करताना सर्वसामान्य माणसाची मानसिकता विजिगीषु करण्यासाठी नेत्याने काय केले पाहिजे ह्याचे अनेकानेक प्रसंगांनी प्रत्यंतर घडवले. ह्या तिघांना अखंडतेचा आणि पूर्णत्वाचा ध्यास लागलेला होता. समाज एकसंध करणे हे त्यांचे ध्येय होते. षष्ट्यब्दीपूर्तिनंतर तरी शहाणे होऊन पुढची महाराष्ट्राची वाटचाल भारताचे नेतृत्व करण्याच्या दृष्टीने आणि पुरुषार्थाच्या दिशेने झाली पाहिजे. ते मनात ठेवून काही सूचना ह्या लेखात करतो आहे.
श्रीमती प्रतिभा पाटील राष्ट्रपती असताना राष्ट्रपती भवनात त्या, मी आणि माझे कुटुंबीय ह्यांचा एकत्र चहापानाचा आणि मनोविनोदनाचा कार्यक्रम झाला. त्या आमदार असल्यापासूनची ओळख. आमदार निवासातील त्यांच्या खोलीत काही वेळा त्या स्टोव्हवर स्वयंपाक करीत आणि त्यांच्या हातचा चहा मी त्यावेळी प्यालो आहे. राष्ट्रपती भवन फिरलात, तर कसे वाटले असा प्रश्न त्यांनी मला विचारला. पूर्वी स्पष्ट बोलायचा तसेच आताही बोला ह्या शब्दात त्यांनी माझ्यावरचा ताण सैल केला. राष्ट्रपती भवन फिरल्यावर आपण स्वतंत्र झालो आहोत असे वाटत नाही असे मी म्हटले. मग थोडी चर्चा झाली आणि काय करायला हवे असे त्यांनी विचारले. राष्ट्रपती भवनात शिरताच दर्शनी भागात महादजी शिंद्यांचे पूर्णाकृती तैलचित्र लावा, अशी सूचना तेव्हा मी केली. त्यांना ती आवडली. मात्र त्यासाठी महाराष्ट्रातून आणि मध्य प्रदेशातून आग्रह धरला गेला, तर विषय पुढे सरकवणे सोपे होईल, असे त्यांनी सुचविले. मी तसे प्रयत्न केले, पण अपेक्षित प्रतिसाद मिळवू शकलो नाही. देवेंद्र फडणवीस सरकारला हा विषय पुढे नेता येईल. नरेंद्र मोदी सरकार हा विषय उचलून धरेल आणि राष्ट्रपती भवनात महादजी शिंदे स्थानापन्न होतील.
महादजी शिंदे हा मोगल बादशहाचा वजीर-इ -मुतालिक म्हणजे पंतप्रधान होता. पेशव्यांच्या वतीने ही पंतप्रधानकी तो सांभाळत असे. नाना फडणीस आणि महादजी शिंदे ह्यांनी व्यापक देशहित लक्षात घेऊन मराठे सरदार आणि मुत्सद्दी ह्यांना आपापसातले मतभेद मिटवायला लावले आणि स्वातंत्र्योत्सुक अशा कर्तृत्ववान पुरुषांची एकसंध फळी देशभर उभी केली. इंग्रजांना शेवटपर्यंत सामरिक आणि राजनैतिक पातळ्यांवर लढावे लागले ते महादजी आणि नाना ह्या जोडीशी. राष्ट्रीय आव्हानांना संयुक्तपणे आणि एक हृदयाने सामोरे जाण्याचा निर्णय नाना आणि महादजी ह्यांनी घेतल्याची बातमी निजामाच्या दरबारातील पेशव्यांचे वकील गोविंदराव काळे ह्यांना कळली. तेव्हा अतिशय आनंदित होऊन त्यांनी नानांना अभिनंदनाचे पत्र पाठविले. त्यात हिंदुराष्ट्र स्थापनेचे ध्येय मराठ्यांना किती प्रिय होते ते व्यवस्थितपणे शब्दबद्ध झाले आहे. शिवाजी महाराजांच्या हिंदवी साम्राज्याचा भार ज्यांनी आपल्या समर्थ खांद्यांवर पेलला अशा थोर नेत्यांमध्ये महादजी शिंदे अग्रभागी आहेत. त्यांच्या स्मृतीस वंदन करून अभ्यागतांनी राष्ट्रपती भवनात पाऊल टाकणे ह्याने त्या वास्तूचा यथोचित सन्मान केल्यासारखे होणार आहे. भारताच्या पारतंत्र्याविरुद्धच्या लढ्यात महाराष्ट्राचा सहभाग किती देदिप्यमान आहे ह्याची समस्त भारतीयांना व्हायला हवी तशी जाणीव होईल. पुसला गेलेला इतिहास पुनःप्रकाशात आणण्याचे हे राष्ट्रकार्य आहे आणि त्यादृष्टीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने तत्काळ सूत्रे हलवावीत इतके ते महत्त्वाचे आहे.
दुसरे महत्त्वाचे कार्य आहे सावरकरांच्या मार्सेलिसच्या उडीचे. फ्रान्स सरकारच्या सहकार्याने तेथे ह्या जगप्रसिद्ध उडीचे स्मारक व्हावे म्हणून महाराष्ट्रात काही व्यक्ती आणि संस्था गेली काही वर्षे प्रयत्नशील आहेत. मी स्वतः 12 वर्षांपूर्वी दिल्लीत महाराष्ट्र सदनात मराठी संसद सदस्यांची बैठक घेऊन या विषयाची चर्चा केली आहे. शेतकरी संघटनेचे शरद जोशी आणि भाजपचे बाळासाहेब आपटे ह्यांनी हा विषय प्राधान्याने मांडावयाचा महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा विषय झाला पाहिजे अशी भावना त्या सभेत व्यक्त केली होती. गोपीनाथ मुंडे ह्यांनी लगेच संसदेत जाऊन सुषमा स्वराज ह्यांच्याशी बोलणे केले होते आणि त्यांनीही मनावर घेऊन त्याच दिवशी सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला होता. तरी अजून स्मारक उभे राहिलेले नाही. स्वातंत्र्यलालसचे संबंध जगातील तरुणांना स्फूर्ती देणारे आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून ते एक दिवस यथोचित सन्मानाने उभे राहील हा माझा विश्वास आहे, पण तोपर्यंत दुसर्या पातळीवर सावरकरांच्या समुद्रउडीचा हा विषय खळाळता ठेवता येईल.
महाराष्ट्रातील जलतरण तलावांना हा विषय प्रवाहित करता येईल. तलावाच्या बाजूला कमीत कमी एक आणि अधिकाधिक तीन सरंक्षक भिंती असतात. ह्या भिंतींवर, बंद्याच्या वेशातले सावरकर प्रसाधनगृहाची खिडकी उघडत आहेत, अंग बाहेर काढून समुद्रात उडी मारत आहेत, किनारा गाठून भिंत चढत आहेत, फ्रान्सच्या भूमीवर पाऊल ठेवून मुक्ततेचा आनंद व्यक्त करत आहेत आणि नंतर ब्रिटिश पोलिसांकडून त्यांचा पाठलाग होत आहे अशी चित्रे रंगविता येतील. कवी मनमोहन ह्यांनी ह्या उडीचे वर्णन पुढील शब्दात केले आहे. जगतात फक्त आहेत, विख्यात बहाद्दर दोन, जे गेले आईसाठी, सागरास पालांडून, हनुमंतानंतर आहे, ह्या विनायकाचा मान. राजद्रोहाच्या आरोपाखाली बंदी म्हणून सावरकरांना लंडनहून मुंबईला आणण्यात येत होते. सावरकरांना जन्मठेपेत सडायचे नव्हते. म्हणून मार्सेलिसला जलयान थांबताच त्यांनी संडासाच्या अरुंद खिडकीतून रक्ताळलेले शरीर कष्टपूर्वक बाहेर काढून उडी मारली. ते फ्रान्सच्या भूमीवर असताना आणि त्या सरकारकडे त्यांनी राजाश्रय मागितला असताना ब्रिटिशांना त्यांना पकडता येत नाही, ह्या नैर्बंधिक मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात अभियोग उभा राहिला. जगभर साम्राज्य असणार्या ब्रिटनच्या दबावाला बळी पडून न्यायालयाने सावरकरांच्या विरुद्ध निर्णय दिला, पण त्यामुळे सर्व युरोप खंडात खळबळ माजून भारताचे स्वातंत्र्य पहिल्यांदा जगाच्या आस्थेचा आणि चिंतेचा विषय झाला. मार्क्सच्या नातवाने सावरकरांचे वकीलपत्र घेतले आणि इंग्रज हे शोषक आहेत आणि भारत हा शोषित आहे हे पहिल्यांदा जगाच्या प्रकर्षाने लक्षात आले. सावरकरांना फ्रान्सच्या भूमीवर अटक करणे अनैर्बंधिक असल्याचे ब्रिटनने अनिच्छेने मान्य केले, पण सावरकर हा ब्रिटिश साम्राज्याचा सर्वात मोठा आणि धोकादायक शत्रू असल्याने आम्ही विधिनिषेध पाळत नाही हेही त्यांनी स्पष्ट केले. तेव्हा मार्सेलिसची समुद्रउडी हा भारताच्या स्वांतत्र्य आंदोलनातला सर्वोच्च पराक्रम आहे. सर्वोच्च संस्मरणीय असा ऐतिहासिक क्षण आहे. त्या उडीने जग हलले आणि भारताच्या मुक्ततेकडे आपुलकीने पाहू लागले. 1857च्या स्वातंत्र्य समरानंतर ह्या उडीने मोठा धक्का ब्रिटिशांना दिला. म्हणून जलतरण तलावात ह्या उडीचे स्मारक झाले पाहिजे. पोहायचे ते केवळ शरीरस्वास्थ्यासाठी नव्हे, तर बंधमुक्त होण्यासाठी हा संस्कार ह्या स्मारकाने झाला पाहिजे.
फडणवीस सरकारने मनावर घेतले, तर शासनाच्या आणि महापालिकांच्या जलतरण तलावात चांगल्या चित्रकारांना देशासाठी कलाविष्कार करण्याची संधी मिळू शकेल. मग ती लोकचळवळ होईल आणि राज्यातील सर्व तलावात सावरकरांची उडी हा चिरंतन प्रेरणेचा विषय होईल. मुंबईच्या विलेपार्ल्यातील जलतरण तलावात माझे शाळकरी सोबती आणि भूतपूर्व महापौर डॉ. रमेश प्रभू ह्यांच्या सहकार्याने ही चित्रे काढण्याचे काम मी सुरू केले होते, पण प्रभूंच्या निधनाने ते थांबले. पुन्हा सुरू करता येईल. फ्रान्स-इंग्लिश खाडी पोहण्याच्या स्पर्धा होतात. त्यात भाग घेणार्या भारतीय स्पर्धकांना, अंगाला पाणी लागताच तुम्हाला प्रथम कोणाची आठवण येते, असा प्रश्न विचारला तर, सावरकरांची, असे उत्तर त्यांच्या तोंडून पटकन बाहेर पडते. फारसा खर्च नसलेली आणि स्थानिक चित्रकारांच्या आविष्करणाला वाव देणारी ही योजना आहे. पुढील लेखात शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांचे आजच्या परिस्थितीत स्मारक कसे करता येईल ह्याचा विचार करू.
-अरविंद विठ्ठल कुळकर्णी (मो. क्र. 9619436244)