मोहोपाडा : प्रतिनिधी
ग्रामीण भागात जनावरांच्या वैरणाचा प्रश्न गंभीर बनल्याने शेतकर्यांच्या संसाराला हातभार लावणारी पाळीव जनावरे रणरणत्या उन्हाळ्यात सांभाळणे मोठ्या जोखमीचे झाले आहे.
पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी तसेच वैरण निर्माण होत नसल्याने जनावरे जगविण्यासाठी पेंढा विकत घ्यावा लागत असून शेकडा 400 ते 500 रुपये मोजावे लागतात. चारा टंचाईची झळ मुक्या प्राण्यांना बसत असून पेंढा आण्यासाठी बैलगाडीचा आधार घ्यावा लागत आहे, अशी व्यथा शेतकर्यांनी मांडली. सध्या माणसाच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवणे मोठ्या कष्टाचे होत असून त्यात मुक्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करताना शेतकर्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. शेतकर्यांचा जास्तीत जास्त वेळ शेतीची कामे करण्यापेक्षा जनावरांना चारा उपलब्ध करण्यामध्ये जात आहे. पूर्वी शेतात अथवा मैदानात जनावरे चरायला सोडले तरी त्यांच्या खाद्याचा प्रश्न मार्गी लागत असे, मात्र आता वणवे लागत असल्याने चार्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यातच पाणीटंचाईची झळ बसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. वाढत्या महागाईमुळे जनावरांच्या खाद्याच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, शेतकर्यांना पशुधन सांभाळणे जिकिरीचे होत आहे.