पनवेल ः वार्ताहर
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ज्यांची लग्न जमली आहेत, त्यांच्यामध्ये एकप्रकारे नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यासाठी शिवकर ग्रामपंचायतीने पुढाकार घेत गावातील मुलींचे जमलेले विवाह लावून देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या वरच्या हॉलमध्ये व्यवस्था केली आहे. मंगळवारी या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत आणखी एक विवाह पार पडला. या कामातून शिवकर ग्रामपंचायतीने इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी मार्चपासून लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. पनवेल तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढतच चालली आहे. त्यातच ज्यांचे लग्न जमलेत, त्यांना या लग्नसराईत विवाह करता येत नाहीत. या कठीण प्रसंगात शिवकर ग्रामपंचायतीने लग्न जमलेल्या जोडप्यांचे विवाह लावून देण्याचा संकल्प केला आहे. याकरिता सरपंच अनिल ढवळे यांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी अजित महाराज खुतले या पुरोहितांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये लग्न पार पडले. शिवकर गावातील तुकाराम मुंढे यांची कन्या जान्हवीचा विवाह अलिबाग तालुक्यातील महाजने गावचे बामा अवचटकर यांचा पुत्र अरविंदबरोबर ठरला होता, मात्र कोरोनामुळे लग्न होणार कसे, असा प्रश्न पडला होता, परंतु मंगळवारी दुपारी 12.35 मि. या शुभ मुहूर्तावर या दोघांचा विवाह संपन्न झाला. या वेळी आप्तेष्ट उपस्थित होते. वर्हाडी मंडळींनी सामाजिक अंतराचे पालन केले. जान्हवी व अरविंद यांनी मास्क लावून सप्तपदी केली. यापूर्वी 18 एप्रिल रोजी प्रगती पाटीलचा विवाह अलिबागमधील खिडकी गावचा सुपुत्र नंदन पाटीलशी शिवकर ग्रामपंचायतीत झाला. कोरोनाच्या या वैश्विक संकटात शिवकर ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबवून गावकर्यांना आधार दिला. स्वस्त भाजी केंद्रापासून गोरगरिबांना अन्नवाटपही करण्यात आले.