खालापूर, चौक, खोपोली, मोहोपाडा ः प्रतिनिधी
इर्शाळवाडीत दरड दुर्घटनेनंतर सुरू असलेली शोधमोहीम ग्रामस्थांच्या विनंतीनंतर थांबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (दि. 23) प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. या दुर्घटनेत 27 जणांचे मृतदेह हाती लागले असून 57 जण बेपत्ता आहेत. या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालत जमावबंदीचा आदेशही लागू करण्यात आला आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाशी चर्चा करीत इर्शाळवाडी दुर्घटनेतील शोधमोहीम थांबवल्याची माहिती देण्यासाठी खालापूर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. स्थानिक आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह अन्य अधिकारी सोबत उपस्थित होते.
या वेळी इर्शाळवाडीतील माहिती देताना पालकमंत्री सामंत म्हणाले की, या ठिकाणी 43 कुटुंबं वास्तव्यास होती. यापैकी 57 जण बेपत्ता असून 27 मृतदेह सापडले आहेत. दोन कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. एनडीआरएफच्या पथकाला शनिवारी छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडल्याने शोधकार्य थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बचावलेल्या 141 लोकांचे तात्पुरते पुनर्वसन चौक येथे कंटेनरमध्ये करण्यात येत आहे. त्यांना सिडकोच्या माध्यमातून घरे बांधून देण्यात येतील. पालकमंत्र्यांनी शोधमोहिमेत सहकार्य करणार्या सामाजिक संघटनांचे आभार व्यक्त केले.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …