Breaking News

घरकुलांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे -विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ

अलिबाग : प्रतिनिधी

सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण असून राज्य शासनानेही त्याचा स्वीकार केला आहे. त्या अनुषंगाने कोकण विभागातील जिल्ह्यांना घरकुलांच्या कामांचे उद्दिष्ट्य विहीत कालावधीत पूर्ण करावे, असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी शुक्रवारी (दि. 27) येथे दिले.

महा आवास अभियान-ग्रामीण अंतर्गत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित कोकण विभागस्तरीय कार्यशाळेत श्री. मिसाळ बोलत होते. विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ पुढे म्हणाले की, राज्यात व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि पूरक पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी, जागा खरेदी अर्थ सहाय्य योजना, अतिक्रमण नियमानुकूल करण्याची योजना अशा सुमारे आठ योजना एकत्रित राबविण्याचे उद्दिष्ट दिलेले आहे. यासाठी लाभार्थ्यांने घरकुलासाठी जागा उपलब्ध करुन दिल्यास त्या घरकुलाचे काम 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत पूर्ण करता येईल.  तसेच गवंडी प्रशिक्षणाचे काम 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे.  अशी सूचना त्यांनी यावेळी दिली. शहरी भागात राबविण्यात येणार्‍या घरकुल योजनेसंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांची आढावा बैठक घ्यावी.

रोहा, पेण, श्रीवर्धन तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेसाठीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्यांना अनुदानाच्या उपलब्धतेसह मंजुरी प्राप्त होताच त्यांची कार्यवाही करण्यात येईल. रमाई योजनेच्या घरकुलांसाठी जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून प्रस्ताव मागवून घेतले असून ते समाज कल्याण विभागाकडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यात 466 घरकुलांची प्रकरणे प्रलंबित आहेत.  रमाई आवास योजनेतील सन 2019-20 मधील 350 प्रकरणांसाठी अनुदान उपलब्ध झालेले नाही. प्रलंबित प्रकरणासाठी अनुदान उपलब्ध होताच त्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी या वेळी सांगितले.

या वेळी  उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आदिवासी विभाग पेण, समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन उपस्थित होते.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply