नवी मुंबई : बातमीदार
काही दिवसांपूर्वी पनवेल येथील इंडिया बुल्स कोविड केअर सेंटरमधील संशयित नागरिकांनी नवी मुंबई पालिकेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. वेळेवर जेवण मिळत नाही, तसेच कचरा जमा झालेला असतो. दररोज तपासणी केली जात नाही, असे विविध आक्षेप घेण्यात आले होते. अखेर आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी या सेंटरला भेट देत नागरिकांचे गैरसमज दूर केले तसेच प्रक्रिया समजावून सांगत जागृती केली.
इंडिया बुल्स येथील कोविड केअर सेंटरमध्ये दोन स्वतंत्र इमारतींत प्रत्येकाला एक रूम याप्रमाणे 1000 नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी एका स्वतंत्र इमारतीत सौम्य स्वरूपाची लक्षणे असणार्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच दुसर्या स्वतंत्र इमारतीत पॉझिटिव्ह नागरिकांचा संपर्क झाल्याने क्वारंटाइन करणे गरजेचे असलेल्या सर्वसाधारण नागरिकांना अलगीकरण करून राहण्याची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी एका स्वतंत्र इमारतीत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींवर डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. येथील बाह्यरूग्ण तपासणी कक्षात डॉक्टरांनी 24 तास उपस्थित राहावे व तेथील पॉझिटिव्ह आणि क्वारंटाइन व्यक्तींशी दूरध्वनी व सुरक्षेची काळजी घेत सोशल डिस्टन्सिंग पाळून संपर्कात राहावे, असे निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले.
यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय करू नये, अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुसर्या स्वतंत्र इमारतीत केवळ पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आल्याने क्वारंटाइन करून राहणे आवश्यक असलेल्या सर्वसाधारण व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. या सर्वसाधारण व्यक्तींना कोणतीही लक्षणे नसल्याने औषधांची आवश्यकता नाही, तथापि या क्वारंटाइन व्यक्तींचा आमच्यावर कोणतेही औषधोपचार केले जात नाही असा समज झाला असून त्यांना औषधोपचाराची आवश्यकता नाही ही वस्तुस्थिती समजावून सांगण्याच्या सूचना आयुक्तांनी डॉक्टरांना दिल्या, तसेच कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींप्रमाणेच क्वारंटाइन केलेल्या नागरिकांशीही संवाद साधत राहावे, असेही आयुक्तांनी सूचित केले आहे.
-इंडिया बुल्स या ठिकाणी प्रत्येक रूममध्ये गिझरची व्यवस्था असून सकाळी नाश्ता, दोन वेळचे जेवण, दोन वेळा चहा व बिस्किटे तसेच मुलांना दूध व फळे दिली जात आहेत. त्यांच्या नियमित वेळेकडे व स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याच्या स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या. नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये याकरिता अहोरात्र काम करीत असून जे. जे. रुग्णालयातून 24 तासांत रिपोर्ट मिळावेत यादृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने स्वॅब तपासणीसाठी वेगळी रक्कम अदा करून वेगळा स्लॉट घेण्याचाही विचार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.