आमदार गणेश नाईक यांचे महावितरणला पत्र
नवी मुंबई : बातमीदार – घणसोलीतील विजेचा लपंडाव थांबवा अशा सुचनेचे पत्र आमदार गणेश नाईक यांनी विद्युत विभागाला दिले आहे. जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या, सर्व धोके तत्काळ लक्षात घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्यांनी पत्रात केली आहे.
घणसोली परिसरांमध्ये हल्ली वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. असुरळीत वीज पुरवठ्यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. अचानक विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे घरातील अनेक विद्युत उपकरणे नादुरुस्त होतात त्याचा आर्थिक भुर्दंड रहिवाशांना बसतो. या परिसरात अनेक ठिकाणी उघड्या विद्युत डीपी आहेत. त्याचा धक्का लागून अपघात संभवतात.
विजेच्या धक्क्याने यापूर्वी लहान मुले आणि इतर रहिवाशी जखमी झाल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत, परिसरातील ट्रान्सफॉर्मर जुने झाले आहेत. विद्युत वाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. हे सर्व धोके आणि रहिवाशांना होणारा त्रास आमदार गणेश नाईक यांनी वाशी विभागाचे अधीक्षक अभियंता यांना पत्र पाठवून त्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. घणसोली वीज कार्यालयासमोर ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी जागा उपलब्ध आहे. त्याठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा आणि परिसरातील विद्युत समस्या दूर कराव्यात, अशी मागणी आमदार नाईक यांनी अधीक्षक अभियंता यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.